नवी मुंबई : कोकणातील हापूसला पर्याय ठरणारा द. आफ्रिकेतील मलावी मॅन्गो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुर्भे येथील फळ मार्केटमध्ये दाखल झाला आहे. एपीएमसीतील फळ व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे मलावी आंब्याच्या १२0 पेट्या रविवारी दाखल झाल्या आहेत. रंगाने आणि चवीने हापूससारखाच असलेला हा आंबा आफ्रिकेच्या मलावी या प्रदेशात पिकवला जातो.आफ्रिकेच्या मलावी प्रदेशातील शेतकऱ्यांनी २0११ मध्ये दापोली येथून हापूसच्या २७ हजार काड्या नेल्या. त्यावर प्रक्रिया करून मलावी मॅन्गो नावाची संकरित रोपे तयार करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील सुमारे ६00 एकर जमिनीवर या आंब्याचे पीक घेण्यात आले. २0१७ साली या आंब्याचे पहिले पीक आले. यावर्षी प्रथमच येथील शेतकºयांनी हा आंबा मुंबईच्या मार्केटमध्ये पाठविला आहे. पहिल्या टप्प्यात मलावी हापूसच्या १२0 पेट्या रविवारी घाऊक मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. हा आंबा कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आला आहे. या आंब्याचा दर प्रति डझन १५00 ते १८00 रुपये इतका असल्याची माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
आफ्रिकेचा मलावी हापूस एपीएमसीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 3:24 AM