रिक्षाचालकांचा संप अखेर मागे, खारघरमधील प्रवाशांना २० दिवसांनंतर दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:48 AM2017-12-11T06:48:16+5:302017-12-11T06:48:42+5:30
मागील २० दिवसांपासून हद्दीच्या वादावरून सुरू असलेला खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला. शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही रिक्षा संघटनांनी समन्वयाची भूमिका घेत संप मागे घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : मागील २० दिवसांपासून हद्दीच्या वादावरून सुरू असलेला खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला. शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही रिक्षा संघटनांनी समन्वयाची भूमिका घेत संप मागे घेतला.
खारघर शहरातील रिक्षा स्टॅण्डवरून हा वाद विकोपाला गेला होता. खारघर स्थानकावर झालेल्या हाणामारीत दोन्ही संघटनेचे रिक्षाचालक जखमी झाले होते. त्यामुळे एकता रिक्षा संघटनेच्या पदाधिकाºयांनी रिक्षा बंद आंदोलन पुकारले होते. या प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही मध्यस्तीची भूमिका घेतली होती. यासंदर्भात दोन बैठकाही पार पडल्या होत्या; परंतु त्यानंतरही रिक्षांचा संप सुरूच राहिल्याने खारघरमधील प्रवाशांचे हाल सुरू होते. याची गंभीर दखल घेत पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिणी पाटील यांनी शुक्र वारी ७२ रिक्षाचालकांना परवाने रद्द करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली. अखेर या वादावर तोडगा काढण्यासाठी रविवारी आमदार बाळाराम पाटील व विवेक पाटील यांनी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांना एकत्रित बोलावून बैठक बोलावली. या दरम्यान खारघर रेल्वेस्थानकासह कळंबोली, कामोठे अशा तीन ठिकाणी बैठका पार पडल्यानंतर या दोन्ही संघटनांत स्टॅण्डचे वाटप करून या प्रकरणी मार्ग काढण्यात आला. या वेळी उपस्थितांमध्ये नगरसेवक गुरु नाथ गायकर, नगरसेवक हरेश केणी, संतोष तांबोळी, नगरसेवक अजीज पटेल, एकता संघटनेचे अध्यक्ष केसरीनाथ पाटील, तसेच तळोजा येथील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन रिक्षा स्टॅण्डचे असे झाले वाटप
खारघरमधील खारघर एकता रिक्षाचालक संघटना ही आपल्या जुन्या जागी असलेल्या स्टॅण्डवर आपल्या रिक्षा उभ्या करून व्यवसाय करतील. तर तळोजा रिक्षा संघटना हे खारघर रेल्वेस्थानकाजवळ सबवे शेजारी, तसेच डी-मार्ट, प्रणाम हॉटेल, वास्तुविहार, सेक्टर ७ बिकानेर या ठिकाणी आपले रिक्षा स्टॅण्ड उभारून व्यवसाय करतील, असे ठरले.