पावसानंतरही ‘फिफा’चे चारही सामने झाले यशस्वी , तज्ज्ञांची दिवसरात्र मेहनत : शेवटच्या साखळी सामन्यांसाठीही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:26 AM2017-10-12T02:26:02+5:302017-10-12T02:26:22+5:30
पाऊस पडत असतानाही डॉ. डी. वाय. पाटील मैदानावरील आतापर्यंतचे चारही साखळी सामने यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : पाऊस पडत असतानाही डॉ. डी. वाय. पाटील मैदानावरील आतापर्यंतचे चारही साखळी सामने यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले आहे. पावसाचे पाणी तत्काळ वाहून नेण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर केल्यामुळे व तज्ज्ञांची समिती दिवसरात्री मेहनत घेत असल्यामुळे हे शक्य झाले आहे. गुरुवारी शेवटचे साखळी सामने होणार असून, तेही यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे.
नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर ६ आॅक्टोबरला ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना झाला. ५ वाजता सामन्यासाठी टॉस उडविण्यात येत असतानाच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मॅचेस होणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ‘फिफा’च्या व्यवस्थापनासह देशभरातील क्रीडा संघटना व क्रीडाप्रेमींनी मॅचेस होणार का? याविषयी विचारणा करण्यास सुरुवात झाली; परंतु पंधरा मिनिटांत पाऊस कमी झाला व पुढील पंधरा मिनिटांत सामने खेळता येतील एवढे मैदान कोरडे झाले व दोन्हीही सामने विनाअडथळा पार पडले. यामुळे सर्वच यंत्रणांनी डॉ. डी. वाय. पाटील मैदान व्यवस्थापनाचेही कौतुक केले. मैदान बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रामुळे हे शक्य झाले आहे. मैदान तयार करण्यात आल्यापासून अत्याधुनिक तंत्राचा वापर करून स्टेडिअमची निगा राखली जात आहे. मुसळधार पाऊस पडल्यानंतर पुढील दोन तासांमध्ये फुटबॉलसह क्रिकेट सामने घेता येतील, अशी मैदानाची रचना करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रामुळेच पावसामुळे खेळ थांबविण्याची वेळ आली नाही.
‘फिफा’ विश्वचषकातील शेवटचे दोन साखळी सामने गुरुवारी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर होत आहेत. टर्की विरुद्ध पेराग्वे व अमेरिका विरुद्ध कोलंबीया यांच्यामध्ये हे सामने होणार आहेत.
विश्वचषक स्पर्धेतील पहिला गोल याच मैदानावर झाला आहे. प्रत्येक सामन्याला २५ हजारपेक्षा जास्त क्रीडा रसिकांनी हजेरी लावली आहे. शेवटच्या साखळी सामना पाहण्यासाठीही जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्टेडिअम व्यवस्थापनानेही केले आहे.