नवी मुंबई - मुंबई आणि परिसरात फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसेने आज नवी मुंबईत फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खटॅक केले. फेरीवाल्यांना हटवताना मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. रविवारी नवी मुंबईतील वाशी परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम उघडत अनेक अनधिकृत फेरीवाल्यांना हुसकावून लावले.
दरम्यान, फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी असल्याचा सनसनाटी आरोप संजय निरुपम यांनी केला होता. मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे मनसेचे नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आमने सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांची बाजू घेताना निरुपम यांनी हा आरोप केला. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून प्रसारमाध्यमांशी बोलताना निरुपम म्हणाले, "फेरिवाले ही जागतिक समस्या आहे. जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मी फेरिवाल्यांना पाहिले आहे. ही फक्त मुंबईपुरती मर्यादित समस्या नाही. त्यामुळे नागरिकांनी फेरिवाल्यांऐवजी ही समस्या वाढवणाऱ्या पालिका प्रशासनावर टीका करावी. फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात मी गेली अनेक वर्षे संबंधितांशी चर्चा करत आङे. त्यांना परवाने देण्याची मागणी करत आहे. पण यासंदर्भात काहीही हालचाली होत नाही. कारण या सगळ्या रॅकेटमध्ये हप्तेखोरी आहे. ज्यामध्ये मनसेचे नेतेही सहभागी आहेत." मुंबईत जेथे फेरीवाले कमकुवत असतील तेथे मनसेची दादागिरी चालेल. मात्र ज्या भारात फेरीवाले वरचढ असतील तेथे मनसेला मार खावाच लागेल असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. तसेच मुंबईतून मनसेची दादागिरी मोडून काढण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.