स्वच्छ भारत अभियान संपताच प्रसाधनगृहांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:25 AM2018-05-22T02:25:14+5:302018-05-22T02:25:14+5:30
अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली.
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान संपताच शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सीवूड, बोनसरीसह अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांना टाळे लागले आहेत. यामुळे स्वच्छतेची चळवळ अभियानापुरतीच मर्यादित होती का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला. अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली. जुन्या प्रसाधनगृहांची डागडुजी करण्यात आली. स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ठेकेदारांची नियुक्तीही करण्यात आली होती. परंतु अभियान संपताच स्वच्छतेकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे. सीवूडमधील एनएमएमटीच्या डेपोमध्ये नवीन प्रसाधनगृह उभे केले होते. अभियान सुरू असताना ते सुरू केले होते. अभियान संपताच त्याला टाळे लावले आहेत. आता पुढील वर्षी अभियानामध्येच पुन्हा ते सुरू करणार का असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. बोनसरी गावातील नाल्याच्या बाजूलाही अभियान काळात फिरते शौचालय बसविले होते. ते अद्याप सुरू झालेले नाही. शौचालयासाठी मल वाहून नेणारी वाहिनी टाकण्यात आलेली नाही. फक्त दिखाव्यापुरतीच सोय करण्यात आलेली आहे. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरही नवीन प्रसाधनगृह उभारले असून ते अद्याप सुरू केलेले नाही.
प्रसाधनगृहांच्या देखभालीची स्थितीही बिकट आहे. सायन - पनवेल महामार्गावर वाशीजवळील प्रसाधनगृहामधील मलनि:सारणचे पाणी रोडवर येवू लागले आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूला डबके तयार झाले असून दुर्गंधी पसरू लागली आहे. याठिकाणी चोवीस तास प्रवाशांची ये - जा असते. पण रात्री प्रसाधनगृह बंद ठेवले जात आहे.
सारसोळे सेक्टर ६ व रामलीला मैदानाला लागून असलेल्या प्रसाधनगृहाचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही. मुंबई
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
भाजी, धान्य मार्केटजवळील प्रसाधनगृहांची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही.