नवी मुंबई : माथाडी नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या टीकेनंतर कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परस्परांवरील टीकेनंतर मंगळवारी सर्व नेते एकाच व्यासपीठावर येऊन कामगारांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला व संघटना राजकारणापासून दूर ठेवण्याचे आश्वासन दिले.कळंबोलीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेमध्ये माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. शासन माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर संघटनेचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे व जगताप यांच्यावर टीका केली होती. संघटनेमध्ये राजकारण सुरू झाल्याची टीका करून आता गद्दार ओळखण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर संघटनेमध्ये राजकीय फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. कामगारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. २३ मार्चला माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. नेत्यांनी राजकारण व समाजकारण वेगळे ठेवावे, असे आवाहन कामगारांनी केले.माथाडी नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनीही कामगारांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. यापुढे अण्णासाहेबांची संघटना राजकारणापासून दूर ठेवून जे कोणी सत्तेवर येतील त्यांच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. नेते एकाच व्यासपीठावर आल्यामुळे कामगारांमधील संभ्रम काही प्रमाणात दूर झाला असला तरी ही एकजूट कायमस्वरूपी टिकणार का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. २३ मार्चला होणाऱ्या मेळाव्यात कोण काय भूमिका घेणार याविषयीही उत्सुकता लागून राहिली आहे.
टीकेनंतर माथाडी नेते एकाच व्यासपीठावर, संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 4:14 AM