सात जणांच्या मृत्यूनंतर जुई पुलाचे दुरुस्तीकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:38 AM2018-03-19T02:38:44+5:302018-03-19T02:38:44+5:30
सायन-पनवेल मार्गावरील जुई पुलाचे दुरुस्तीकाम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गत आठवड्यात एकाचा बळी गेल्यानंतर गुन्हा दाखल होताच विभागाला जाग आली आहे.
नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील जुई पुलाचे दुरुस्तीकाम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गत आठवड्यात एकाचा बळी गेल्यानंतर गुन्हा दाखल होताच विभागाला जाग आली आहे. यामुळे सदर ठिकाणी दुचाकींच्या अपघातांना भविष्यात आळा बसणार आहे.
सायन-पनवेल मार्गावर सानपाडा ते वाशी दरम्यानच्या जुई पुलाचा काही वर्षांपूर्वी विस्तार करण्यात आला आहे. मात्र या विस्ताराच्या कामादरम्यान पुलाचा नवा व जुना भाग जोडण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आलेला आहे. परंतु कामातील त्रुटीमुळे दोन रॉडमध्ये समान उंची नसल्याने त्याठिकाणी दुचाकींचे अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी २०१६ पासून पोलीस प्रयत्न करत आहेत. परंतु वाशी शहर व वाहतूक पोलिसांकडून अनेकदा पत्रव्यवहार करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत होते. यामुळे तीन वर्षात त्याठिकाणी शेकडोच्या वर छोटे-मोठे अपघात झाले असून त्यात सात जणांचा बळी गेला आहे. वाशीच्या दिशेने जाणारी दुचाकी दोन रुळातील अंतरामुळे घसरून हे अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलाची दुरुस्ती तत्काळ व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. याचदरम्यान १० मार्च रोजी दुपारी पुन्हा एकदा झालेल्या अपघातामध्ये एकाचा प्राण गेला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होताच खडबडून झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तिथले दुरुस्तीकाम हाती घेतले आहे. उशिरा का होईना, परंतु पी.डब्ल्यू.डी. विभागाला जाग आल्याचे समाधान पोलिसांनी व्यक्त केले आहे.
>जुई पुलाचा जुना व नवीन भाग जोडण्यासाठी सुमारे ७० ते ८० मिटर लांबीचा लोखंडी रॉड वापरण्यात आलेला आहे. या दोन्ही रॉडमध्ये फट राहिली असून सुमारे चार ते पाच इंच उंचीचाही फरक आहे. या फरकामुळे त्याठिकाणी दुचाकींचे चाक घसरुण अपघात घडत होते. हे अपघात टाळण्यासाठी लोखंडी रॉडमधील अंतर सिमेंट अथवा डांबराने भरुन काढणे आवश्यक होते. परंतु सात बळी गेल्यानंतर प्रत्यक्षात हे काम मार्गी लागले आहे.