दिवाळीनंतर खारघर शहरात वाढले सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 12:51 AM2020-11-26T00:51:36+5:302020-11-26T00:52:06+5:30
गर्दीचा फटका
वैभव गायकर
पनवेल: मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदींसह पनवेल पालिका मोठी लोकसंख्या असलेली महानगरपालिका आहे. कोविडचा वाढता धोका लक्षात घेता नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या पालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र दिवाळी नंतरदेखील पालिका क्षेत्रात काही ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामध्ये खारघर शहर आघाडीवर आहे.
खारघर शहराची लोकसंख्या मोठी आहे. शहरात मोठ्या संख्येने हॉटेल्स आहेत. मोठी मोठी दुकाने असल्याने होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढते आहे. विशेष म्हणजे अनलॉक नंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने खारघरमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. सध्या पालिका क्षेत्रात एकूण २४ हजार ९६९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३ हजार ८४९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ५४५ रुग्ण उपचार घेत आहेत. कोविडची दुसरी लाट येण्यापूर्वीच पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना
सतर्कतेचे अवाहन करीत शासन नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सात जणांचा मृत्यू
पनवेल महापालिका क्षेत्रात दिवाळी सणानंतर १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तळोजा येथील तीन, खारघरमधील दोन व पनवेल आणि कामोठे शहारातील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
खारघर शहराची लोकसंख्या मोठी आहे. तसेच नागरिकांच्या हलगर्जीपणामुळेच दिवाळीनंतर कोविड रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.
- डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका
खारघर शहराची लोकसंख्या मोठी आहे. तसेच नागरिकांच्या हलगर्जीपणामुळेच दिवाळीनंतर कोविड रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.
- डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका