प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:49 AM2019-05-24T00:49:37+5:302019-05-24T00:49:48+5:30
मतमोजणीच्या ठिकाणाचे लाइव्ह चित्रण
- विश्वास मोरे
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील लढत ही चुरशीची आणि प्रतिष्ठेची होती. त्यामुळे बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी दिसून आली. दुपारपर्यंत ही गर्दी कमी होती. विजयाचा कल समजताच कार्यकर्त्यांनी पुन्हा गर्दी केली. दिवसभर फेरीतील कलानुसार कार्यकर्त्यांचाही उत्साहही वाढत गेला.
पहिल्या फेरीत उत्साह कमी
बालेवाडी क्रीडासंकुलात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, वाहतुकीचे नियोजन केले होते. त्यामुळे वाहतूककोंडी टळली होती. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे थांबण्याची व्यवस्था केली आहे. सुरुवातीला या ठिकाणी उत्साह कमी होता.
पाचव्या फेरीपर्यंत नेते फिरकले नाहीत
म्हाळुंगे चौकी ते जिजामाता चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाचव्या फेरीनंतर राष्ट्रवादी व युतीचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या टप्प्यात दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या ठिकाणी फिरकले
नाही.
सोळाव्या फेरीपर्यंत उत्साह होता कमी
सोळाव्या फेरीनंतर मावळचा निकालाचा कल दिसू लागला. बारणे यांच्या पारड्यात अधिक मते पडत असल्याचे चित्र असताना युतीचे कार्यकर्ते बालेवाडीत येऊ लागले.
विसाव्या फेरीनंतर उत्साह
विसाव्या फेरीनंतर निकाल स्पष्ट होऊ लागल्यानंतर युतीत उत्साह वाढल्याचे दिसून आले़ दुपारी ३.३० नंतर कार्यकर्ते येऊ लागले.
पंचविसाव्या फेरीनंतर उत्साहात वाढ
पंचविसाव्या फेरीनंतर उत्साह वाढला. ४ च्या सुमारास खासदार बारणे मतमोजणी केंद्रात आले. त्या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर जल्लोष केला. अभूतपूर्व उत्साह दिसून येत होता. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार राम ठाकूर, आमदार बाळा भेगडे, आमदार गौतम चाबुकस्वार, प्रशांत ठाकूर आदी दाखल झाले होते. या वेळी आमदार जगताप यांनी बारणे यांना मिठी मारली. पेढाही भरविला. याच वेळी डॉ. अमोल कोल्हेही आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
बालेवाडीत शिरूर आणि मावळची मतमोजणी होती. मावळमधून बारणे तर शिरूरमधून डॉ. कोल्हे विजयी झाले. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी आणि महायुतीत एकीकडे थोडी खुशी, थोडा गम असल्याचे दिसून आले.