नवी मुंबई : भारतीय वायुसेनेत पायलट होण्याचे स्वप्न अर्धवट सोडून वडिलांच्या जागी पोलीस होण्याची वेळ पोलीसपुत्रावर आली आहे. यासाठी तीन वर्षाच्या प्रशिक्षणावर त्याने पाणी सोडले आहे. वडिलांच्या निधनानंतर पाच महिन्यातच आईचेही छत्र हरपताच एकाकी पडल्याने अनुकंपा तत्वावर मिळालेली नोकरी त्याने स्वीकारली आहे.कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर पोलीस दलात घेतले जात आहे. त्यानुसार नवी मुंबई आयुक्तालयातील १९ पात्र उमेदवारांनी मंगळवारी नियुक्तीपत्र स्वीकारले. त्यात तळोजा पोलिसठाण्याचे शहीद पोलीस कर्मचारी भास्कर भालेराव यांचा मुलगा ओंकार याचाही समावेश आहे. ओंकार याला भारतीय वायुसेनेत पायलट व्हायचे होते. त्यासाठी तीन वर्षाचे प्रशिक्षण घेऊन तो नियुक्तीच्या अंतिम टप्यात पोचला होता. तत्पूर्वी जून महिन्यात वडील भास्कर यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच आईचेही छत्र हरपले. यामुळे एकाकी पडलेल्या ओंकार पुढे पुढील आयुष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी त्याला वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर पोलीस दलात भरती होण्याची संधी दिली. यावेळी पायलट होण्याचे स्वप्न असताना पोलीस बनण्याची संधी धरू कि सोडू अशी द्विधा मनस्थिती झाली होती. अखेर वडिलांच्या जागी पोलीस दलात राहून देखील आपण देशसेवा करू शकतो असा संकल्प त्याने मनाशी केला. यादरम्यान पोलीस दलात भरती होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आईने शेवटच्या श्वासापर्यंत मदत केली. त्यानंतर वडिलांच्या पोलीस मित्रांनी सर्वोत्परी प्रयत्न करून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून अनुकंपा तत्वाची नोकरी मिळवण्यास त्याला पात्र होण्यास हातभार लावला.
असाच प्रसंग पोलीसपत्नी रुपाली दडेकर यांच्यावर ओढवला आहे. कोरोनामुळे पती अविनाश यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्च्यात सासू व दोन लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. कोविड योद्धा म्हणून शासनाने दिलेले अनुदान जरी मिळाले असले, तरीही भविष्यासाठी कुठेतरी नोकरी शोधण्याच्या त्या प्रयत्नात होत्या. याचदरम्यान अनुकंपा तत्वात पोलीस होण्याची आलेली संधी त्यांनी स्वीकारली.