तात्पुरती मोटर बसवून पाणीपुरवठा; चार दिवसांनी भागली अडीच हजार विद्यार्थ्यांची तहान
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 10, 2023 05:32 AM2023-12-10T05:32:08+5:302023-12-10T05:32:21+5:30
घणसोली सेक्टर ७ येथील महापालिका शाळेत अखेर चार दिवसांनी पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : घणसोली सेक्टर ७ येथील महापालिका शाळेत अखेर चार दिवसांनी पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे अडीच हजार विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय टळली आहे. ही सोय तात्पुरती असून विद्युत विभागाकडून मोटर दुरुस्तीचे काम येत्या आठवड्यात हाेईल असे महापालिकेने सांगितले. विद्युत विभागाच्या दिरंगाईमुळे या शाळेतील अडीच हजार विद्यार्थी व शिक्षकांना पाण्याविना तीन दिवस काढावे लागले. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केले हाेते.
शाळेतील टाकीत पाणी असतानाही केवळ मोटर बंद असल्याने शाळेतील नळापर्यंत पाणी पुरवले जात नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधी आल्यास घर अथवा जवळपासचे सार्वजनिक शौचालय गाठावे लागत होते. त्यामध्ये विद्यार्थिनी व शिक्षकांची मोठी गैरसोय होत होती. भूमिगत टाकीतून शाळेपर्यंत पाणी पुरवणाऱ्या मोटरमध्ये बिघाड झाल्याने हा प्रसंग निर्माण झाला होता. ‘लोकमत’ने शाळेतल्या समस्येला वाचा फोडताच शनिवारी तात्पुरती पर्यायी मोटर जोडून शाळेला पाणीपुरवठा करण्यात आला.
त्या ठिकाणी निर्माण झालेली समस्या पहिल्यांदा नव्हती. तीन महिन्यांपूर्वी देखील तिथल्या दोन्ही विद्युत मोटरमध्ये बिघाड झाल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद झाला होता. पाणीउपसा करण्यासाठी टाकीत बसवलेल्या मोटरमध्ये सातत्याने बिघाड होत असून प्रत्येक वेळी दुरुस्त करून जुनीच मोटर बसवली जात आहे.
टाकीत गाळ, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ
भूमिगत टाकीतली मोटर काढण्यासाठी टाकीतल्या पाण्याचा उपसा केला असता, टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने उपस्थितांच्या निदर्शनात आले. यामुळे त्याच वेळी टाकीतील गाळ देखील काढून टाकी स्वच्छ करून घेण्याचेही काहींनी सुचवले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मागील अनेक दिवसांपासून या टाकीतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने टाकी स्वच्छ करून घेण्यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांना कळवले आहे.
विद्यार्थ्यांना कधी पाण्याविना ठेवून तर कधी दूषित पाणी पाजून आरोग्याशी खेळ चालवला होता.