सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांकडून निर्माल्याचे विसर्जन केले जाते. मात्र यावेळी निर्माल्याबरोबरच नैवद्य, उरलेले अन्नही टाकण्यात येत असल्याने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निर्माल्यात टाकण्यात येणारे अन्न उपयोगात येऊ शकते, चांगले पदार्थ देखील निर्माल्य कुंडात टाकले जात असल्याचे गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे अन्नाच्या नासाडीबाबत गणेशभक्तांमध्ये जनजागृती होण्याची गरज असल्याचे मत मुंढे यांनी व्यक्त केले आहे. बाप्पाच्या आगमनानंतर घरातील आबालवृध्द सारेच त्याच्या सेवेला लागतात. त्याच्या पाहुणचारात काहीही कमी पडू नये याकरिता सजावटीसह मोदक, लाडू, पेढे, नैवेद्याचे योग्य नियोजन केले जाते. काही ठिकाणी बाप्पासमोर ठेवण्यात येणारी फळे, नवैद्याचे वाटप करण्यात येते. तर काही जण त्यांचे निर्माल्यास विसर्जन करतात. शनिवारी वाशीतील विसर्जन तलावाला भेट दिली असता हा प्रकार आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आला. गणेशभक्तांनी निर्माल्य कुंडात टाकलेला केळीचा घड उचलून त्यांनी पाहणी केली. खाण्यासाठी योग्य असतानाही ही केळी निर्माल्य कुंडात टाकण्यात आली होती. निर्माल्याच्या सफरचंद, नारळ, नैवेद्य टाकण्यात येत असल्याने मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली. दीड दिवसांपासून ते दहा दिवसाच्या विसर्जना दरम्यान प्रत्येक विसर्जन स्थळावरील निर्माल्य कलशामध्ये हेच चित्र पहायला मिळत असते. अनेकदा मूर्ती सोबत हार फुलाच्या निर्माल्याचे विसर्जन करताना फळे देखिल पाण्यात सोडली जातात. अथवा निर्माल्य कलशात टाकली जातात. परंतु हिच फळे व पदार्थ गरीब गरजूंना दिल्यास त्यांची भूक भागवू शकतात, असा विचार अनेकांकडून केला जात नाही. घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या सेवेसाठी अनेक गणेश मंडळांकडून दहा दिवस सकाळ संध्याकाळ पुरोहितांकडून पूजाअर्चा केली जाते. घरगुती बाप्पांच्या सेवेसाठी तर अवघे कुटुंबच आघाडीवर असते. मात्र बाप्पाचे विसर्जन करताना अनेकांकडून निर्माल्याबरोबरच फळे, नारळ, नैवद्याचेही विसर्जन करण्यात येत असल्याने अन्नाची नाहक नासाडी होते. या पदार्थ्यांचे प्रसाद म्हणून वाटप होण्यास काहीच हरकत नाही.गरीब वस्तीतील मुलांना ही फळे दिल्यास त्यांनाही बाप्पाच्या प्रसाद मिळू शकेल. यंदा शहरात तसेच पनवेल परिसरातील अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणारे, प्रबोधनात्मक, ऐतिहासीक देखावे साकारले आहेत. हे देखावे पहाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याशिवाय अनेक मंडळांकडून विविध स्पर्धा, आरोग्य, रक्तदान शिबिर, अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र केवळ देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याऐवजी सामाजिक बांधीलकी जपण्यावरही मंडळांनी भर देण्याची गरज आहे.
विसर्जनानंतर फळे, नैवेद्यही निर्माल्यात !
By admin | Published: September 13, 2016 3:01 AM