पावसानंतर आता वाट खडतर, डागडुजी नंतरची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:13 AM2018-08-12T03:13:14+5:302018-08-12T03:13:29+5:30
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी झालेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे दुचाकीस्वारांसाठी जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. बहुतांश ठिकाणचे डांबर पावसासोबत वाहून गेल्याने तिथली खडी व वाळू रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. अशा ठिकाणी दुचाकी घसरून अपघातांच्या घटना घडत आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी झालेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे दुचाकीस्वारांसाठी जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. बहुतांश ठिकाणचे डांबर पावसासोबत वाहून गेल्याने तिथली खडी व वाळू रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. अशा ठिकाणी दुचाकी घसरून अपघातांच्या घटना घडत आहेत.
रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांच्या दर्जावर संशय निर्माण करणारी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याचे पाहायला मिळते. तर पाऊस थांबताच त्या ठिकाणी तात्पुरती डागडुजी केली जाते. घणसोली नोडच्या प्रवेशद्वारावर निम्मा रस्ताच खड्ड्यात गेला आहे. तर गोठीवलीत पावसाळ्यापूर्वीच झालेल्या खोदकामानंतर नव्याने रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. त्यानंतरही जागोजागी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे डागडुजीची कामे सुरू आहेत. ऐरोली, गोठीवली, घणसोली तसेच नेरुळ परिसरात अशी कामे सुरू आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी एकदा डागडुजी झाल्यानंतरही पुन्हा खड्डे पडल्याने ते बुजवण्यासाठी वापरली गेलेली खडी रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. ठेकेदाराकडून घाईमध्ये खड्डे बुजवण्याच्या प्रयत्नात कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
पावसातही डांबरीकरण करता येईल, अशा तंत्रज्ञानाच्या शोधात सर्वच ठेकेदार आहेत. या कारणावरून अनेक जण डागडुजीच्या कामात वेळ काढत आहेत. यामुळेच शहरातल्या महत्त्वाच्या सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांचाही प्रश्न मिटलेला नाही; परंतु नोड अंतर्गतच्या रस्त्यांचीही तीच अवस्था झाल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. यावरून प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. त्यामुळे ठेकेदाराकडून डागडुजीच्या कामांना गती देण्यात येत आहे. खड्डे बुजवण्यासाठी खड्ड्यांमध्ये खडी टाकून त्यावर डांबराचा थर मारला जात आहे; परंतु पावसासोबत पुन्हा डांबर वाहून जात आहे. यामुळे खड्डे बुजवण्यासाठी वापरलेली खडी रस्त्यावर सर्वत्र पसरत आहे. परिणामी, अशा ठिकाणी दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. भरधाव दुचाकीच्या चाकाखाली खडी आल्यास चालकाचा तोल जाऊन त्यांचे अपघात होत आहेत. तर काही ठिकाणी कारच्या चाकामुळे खडी उडून पादचारी किंवा दुचाकीस्वारांना लागत आहे. हा प्रकार एखाद्याच्या जीवावर बेतण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. वाशीतील ब्ल्यू डायमंड चौक ते कोपरी सिग्नल मार्गावर खड्डे व खडीमुळे वाहतूककोंडीही होत आहे. अशा सर्वच ठिकाणी रात्रीच्या वेळीही वाहनचालकांची, दुचाकीस्वारांची मोठी गैरसोय होते. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळून शारीरिक दुखणी वाढत आहेत.
वाहनांच्या दुरुस्तीखर्चात वाढ
रस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांना शारीरिक दुखणी देण्यासह वाहनांच्या दुरुस्तीखर्चातही वाढ करणारे ठरत आहेत. वाहने सतत खड्ड्यांमध्ये आपटत असल्याने पार्ट्सला हानी पोहोचत आहे. अनेक मध्यमवर्गीयांना हा खर्च खिशाला झळ पोहोचवणारा असल्याने खड्ड्यांमुळे त्यांची डोकेदुखीही वाढली आहे.