नवी मुंबई : देशातील सहा विमानतळांच्या व्यवस्थापनाचा ठेका असलेल्या अदानी ग्रुपने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ७४ टक्के भाग खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते. तसे झाल्यास मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (मिआल) या जीव्हीके समूहाच्या कंपनीचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. परिणामी, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा अदानी ग्रुपच्या घशात जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे २२६८ हेक्टर जागेरव सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळाचे कंत्राट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाºया जीव्हीके समूहाला देण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि मिआल या दोन्ही कंपन्या जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग कंपनीच्या उपकंपन्या आहेत. तर सिडको नोडल एजेन्सी म्हणून या प्रकल्पाचे काम पाहणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेल्यास जीव्हीकेची उपकंपनी असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थात मिआलचे अधिकारही संपुष्टात येणार आहेत. त्याचा थेट परिणाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंत्राटावर होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे असा कोणताही बदल झाल्यास जीव्हीकेने सिडकोला कल्पना देणे गरजेचे आहे. तसेच त्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घेणेसुद्धा तितकेच बंधनकार आहे. परंतु आतापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही बदलाची जीव्हीकेकडून माहिती प्राप्त झाली नसल्याचे सिडकोच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले. जीव्हीके आणि सिडकोबरोबर झालेल्या करारातील तरतुदी तपासून पाहिल्या जातील. सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी तपासूनच शासनाच्या मंजुरीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही या सूत्राने स्पष्ट केले आहे.