शहरात गोविंदाची घागर उताणीच;पोलिसांच्या आवाहनानंतर मानाच्या अनेक दहीहंड्या झाल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:04 AM2018-09-04T02:04:50+5:302018-09-04T02:05:00+5:30
केरळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक मंडळांनी यावर्षी दहीहंड्या रद्द केल्या, परंतु काही मंडळांनी आपली परंपरा कायम ठेवत यावेळी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचा वसा घेतला.
नवी मुंबई : केरळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक मंडळांनी यावर्षी दहीहंड्या रद्द केल्या, परंतु काही मंडळांनी आपली परंपरा कायम ठेवत यावेळी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचा वसा घेतला, तर काही मंडळांनी बक्षिसाची रक्कम कमी करून केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. गोविंदा पथकांना पर्यावरणाचा संदेश देत काही मंडळांनी सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला. एकूणच यावर्षी सामाजिक जाणिवेतून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शिवाय मानाच्या अनेक दहीहंड्या रद्द झाल्याने गोविंदा पथकांची निराशा झाली. पनवेल परिसरात सुध्दा हेच दृश्य पाहायला मिळाले.
ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ११ लाख रुपयांची हंडी उभारण्यात आली होती. या बक्षिसातील काही रक्कम केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याचे या मंडळाने जाहीर केले आहे. तसेच या उत्सवाच्या माध्यमातून बेटी बचाव, बेटी पढाव, पर्यावरणाचे संवर्धन, मानव जातीचा विकास आदी संदर्भातील संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या संकल्पनेतून हा उत्सव साजरा करण्यात आला. आगरी कोळी गीतांचे बादशहा संतोष चौधरी दादुस आणि मंडळींनी आगरी कोळी नृत्यगीते सादर करून गोविंदांचा उत्साह वाढविला. सायंकाळी ५0 गोविंद पथकांनी सहा थर लावून सलामी दिली.
घणसोली गावातील संस्कार मित्र मंडळाच्या वतीने आयोजक अंकुश पांडुरंग नाईक यांनी प्लॅस्टिक बंदीचा संदेश देत आलेल्या सर्व गोविंदा पथकांना कागदी पिशव्यांचे वाटप केले. कोपरी गावातील सिद्धिविनायक गोविंदा पथकाने वाशीच्या एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमधील हंडी फोडली. घणसोली गावची ११६ वर्षांची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा असलेल्या घणसोली गावकीची अत्यंत प्रतिष्ठेची हंडी कोळीवाडा गोविंदा पथकाने फोडली. गावकीचे अध्यक्ष चेतन पाटील, उपाध्यक्ष शेखर मढवी,सरचिटणीस मिलिंद मढवी आदींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. महापौर जयवंत सुतार यांच्या शिरवणे गावात विनोद-सारिका कला कला क्र ीडा मंडळाच्या वतीने हंडी बांधण्यात आली होती. स्वच्छतेचा संदेश देत गावातील ग्रामस्थांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला पाठिंबा देत स्वच्छ नवी मुंबई आणि सुंदर नवी मुंबईसाठी काम करणार असल्याची माहिती दिली. बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या गावठाण,झोपडपट्टी क्षेत्रात रूढी परंपरेनुसार गावकीच्या दहीहंड्यांची संख्या १५0, नोड्समध्ये लहान मोठ्या ५0 दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे गोविंदा पथकांमध्ये अजिबात उत्साह दिसून आलेला नाही. रस्त्यावर वाहनांची संख्याही कमी होती.
दहीहंडी उत्सवावर निर्बंधांमुळे निरुत्साह
१)न्यायालयाच्या निर्बंधांमुळे पनवेल परिसरात दहीहंडी महोत्सवातील निरुत्साहाचे सावट जाणवले. न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून उत्सव साजरा करता येत नसल्याने अनेक मंडळांनी उत्सव रद्द करून कित्येक वर्षांची परंपरा खंडित केली, तर काही मंडळांनी पारंपरिक व साध्या पध्दतीने उत्सव साजरा केला.
२) पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी मंडळाची बैठक घेवून आचारसंहिता आखून दिली. दहीहंडीची मर्यादित उंची, डीजे व साऊंड सिस्टीम न लावणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आदी नियम या वेळी सांगण्यात आले. सिडको आणि महापालिकेने सुध्दा चौकात व रस्त्यावर दहीहंड्या बांधण्यास परवानगी नाकारली होती.
३)खांदा वसाहतीत संजय भोपी सोशल क्लबच्या वतीने दरवर्षी लाखो रुपयांचे बक्षीस असणारी दहीहंडी लावण्यात येत असे. दोन वर्षापासून आयोजकांनी हा उत्सव रद्द केला. क्र ांतीसेवा संघाच्या वतीने शिवासंकुल येथील मोकळ्या जागेत उत्सव साजरा करण्यात आला. मात्र डामडौल यंदा दिसून आला नाही.
४)कळंबोलीतील जगदीश गायकवाड सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने मोकळ्या मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र यंदा येथे गणपती कला केंद्र टाकण्यात आले.
गोविंदा पथकांनीही फिरवली पनवेलकडे पाठ
पनवेल परिसरातील मोठमोठ्या दहीहंडी उत्सव मंडळांनी उत्सव यावर्षी केला नाही. काहींनी तो अतिशय पारंपरिक पध्दतीने साजरा केला. त्यामुळे मुंबई, ठाणे येथील नामांकित गोविंदा पथकाने पनवेलकडे पाठ फिरवली. अतिशय कमी संख्येने गोविंदा पथक पनवेलला आले होते. त्यातच पाऊस नसल्यानेही या उत्सवाचा उत्साह आणखी कमी झाला. त्यामुळे सायंकाळी काही प्रमाणात उत्साह दिसून आला.