बंडखोरीनंतर शिवसेनेकडून दोन नवीन सदस्यांना संधी
By admin | Published: April 27, 2017 12:15 AM2017-04-27T00:15:43+5:302017-04-27T00:15:43+5:30
शिवसेनेमधील बंडखोर गटाने राजीनामा देण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी पालकमंत्र्यांच्या मूळ यादीतील दोन नावांवर कात्री लावली आहे.
नवी मुंबई : शिवसेनेमधील बंडखोर गटाने राजीनामा देण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी पालकमंत्र्यांच्या मूळ यादीतील दोन नावांवर कात्री लावली आहे. दोन नवीन सदस्यांना संधी देण्यात आली आहे. परंतु सदस्य निवडीनंतरही पक्षातील मतभेद कायम असून सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सभापती व महापौरपद हिसकावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला स्थायी समितीच्या पाच सदस्यांची निवडही एकमताने करता आलेली नाही. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वप्रथम विजय चौगुले, नामदेव भगत, रंगनाथ औटी, सरोज पाटील व द्वारकानाथ भोईर यांच्या नावाची यादी आली होती. परंतु १८ एप्रिलच्या सभेमध्ये नावे निश्चित झाली नाहीत. चौगुले यांच्यासह त्यांच्याच मर्जीतील नगरसेवकांना संधी दिली जात असल्यामुळे पक्षातील जवळपास १५ नगरसेवकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. नाराज नगरसेवकांनी पक्षाचे उपनेते विजय नाहटा व बेलापूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांची भेट घेवून त्यांच्याकडे कैफियत मांडली होती. मोरे यांनी नवीन सदस्यांची भूमिका पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविली होती. चौगुले यांना पक्षाने लोकसभा, विधानसभेची उमेदवारी दिली आहे. जिल्हा अध्यक्ष व विरोधी पक्षनेतेपदही दिले आहे. त्यांनाच पुन्हा स्थायी समितीवर संधी का असा प्रश्न बंडखोर नगरसेवकांनी उपस्थित केला होता. या विषयी मंगळवारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे, विजय नाहटा, विजय चौगुले व इतर नेत्यांची बैठक झाली. यानंतर बुधवारी स्थायी समितीसाठी शिवसेनेच्यावतीने पाच जणांची यादी सादर करण्यात आली. जुन्या यादीतील सरोज पाटील व रंगनाथ औटी यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागेवर दीपाली सपकाळ व ऋचा पाटील यांना संधी देण्यात आली आहे. उर्वरित तीनही नावे कायम ठेवण्यात आली आहेत. दोन नवीन सदस्यांना संधी मिळाल्याने बंडखोर गटातील सदस्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. अन्यायाविरोधात उठविलेल्या आवाजाची दखल वरिष्ठांनी घेतल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. सदस्य निवड झाली असली तरी शिवसेनेतील मतभेद संपलेले नाहीत.