एपीएमसीमध्ये सहा वर्षांनंतर संचालक मंडळ अस्तित्वात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 12:12 AM2020-03-03T00:12:22+5:302020-03-03T07:10:25+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. यामुळे कर्मचारी, माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठण्याची शक्यता निर्माण झाली असून रखडलेली विकासकामे पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहेत.
बाजार समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळविली आहे. बाजार समितीमध्ये सोमवारी पहाटेपासूनच काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. दिवसभर बाजारामध्ये जल्लोषाचे वातावरण होते. या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. २००८ मध्येही या दोघांनी आघाडीची सत्ता आणली होती. डिसेंबर २०१३ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. यानंतर काही संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुदतवाढ दिलेल्या संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला होता. डिसेंबर २०१४ मध्ये बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती केल्यानंतर त्यांनाही धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली होती. दहा लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येत नव्हता. नवीन मार्केटची उभारणी किंवा इतर धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हते. संचालक मंडळाची निवडणूक झाल्यामुळे आता न्यायालयाची बंदी उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाजार समिती निवडणुकीमध्ये व्यापारी मतदारसंघामधून तीन माजी संचालक नशीब अजमावत होते. मसाला मार्केटमध्ये माजी संचालक कीर्ती राणा यांचा पराभव झाला आहे. विजय भुता या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला आहे. भाजी व कांदा मार्केटमधून माजी संचालकांनीच विजय मिळविला आहे. धान्य मार्केटमधूनही नीलेश वीरा हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पाचही मार्केटमध्ये व्यापारी व कामगारांनी जल्लोष केला होता. मार्केटमधील अनेक महत्त्वाचे प्रश्न सहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. नवीन मार्केटमधील गाळावाटप, शीतगृह चालविणे व इतर अनेक कामे प्रलंबित होती. कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणीही रखडली आहे. ही सर्व कामे मार्गी लावता येणार असल्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
७३ मते ठरली अवैध
बाजार समिती निवडणुकीसाठी सहा महसूल विभागांमधील ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान घेण्यात आले. निवडणुकीमध्ये ९२ टक्के मतदान झाले होते. एकूण मतांपैकी ७३ मते अवैध ठरली आहेत. बॅलेट पेपरवर ही निवडणूक घेतली होती.
शेतकरी प्रतिनिधीच सभापती
बाजार समितीवर २७ जणांचे संचालक मंडळ असले तरी निवडून आलेल्या १२ शेतकरी प्रतिनिधींनाच सभापती व उपसभापती होता येते. निवडून आलेल्या १८ सदस्यांमधून या दोन्ही पदांची निवड केली जाते.
मतदारसंघनिहाय उमेदवारांची नावे, कंसात मते -
औरंगाबाद - विजय गंगणे (२), चंद्रकांत जाधव (०), अशोक डक (६२५), प्रल्हाद धनगुडे (२), राधाकृष्ण पठाडे (४४०), अशोक पाटील (२), प्रशांत पाटील (३३८),
राजेश पाटील (३), भागीनाथ मगर (१), निकिता शिंदे (७), वैजनाथ शिंदे (४५९)
नागपूर - हुकुमचंद आमधरे (३८७), शाम कार्लेकर (८८), सुधीर कोठारी (५९२), पवन गोडे (८), विजय देवतळे (४९), अवेशखान पठार (२२६), विनोद वानखेडे (१)
कोकण - दत्तात्रय गायकवाड (१२२), नरेंद्र पाटील (१८), प्रभाकर(प्रभू) पाटील (१८२), राजेंद्र पाटील (१२४), महेंद्र पोटफोड (१००)
अमरावती - शंकर चौधरी (४१), माधवराव जाधव (४३७), भाऊराव ढवळे (५), प्रवीण देशमुख (४८८), पांडुरंग पाटील (३४१), दिलीप बेदरे (२२), गोविंदराव मिरगे (३५)
पुणे - चंद्रसेन काटकर (२), प्रदीपकुमार खोपडे (२७०), महादेव यादव (३), धनंजय वाडकर (३९०), बाळासाहेब सोळसकर (४६३)
नाशिक - प्रभाकर पवार (१३), सुनील पवार (३०८), किशोर पाटील (०), रितेश पाटील (१६), श्रीहर्ष शेवाळे (१५७), अद्वय हिरे (५१८), जयदत्त होळकर (४०२)
भाजीपाला मार्केट - प्रताप चव्हाण (७), शंकर पिंगळे (९९६), विठ्ठल बडदे (५), काशिनाथ मोरे (५३१)
धान्य मार्केट - लक्ष्मीदास वेलजी (२०), पोपटलाल भंडारी (३१७), नीलेश वीरा (४१२)
कांदा मार्केट - अशोक वाळुंज (४३१), सुरेश शिंदे (३), राजेंद्र शेळके (३२५)
मसाला मार्केट - विजय भुता (३१६), अशोक राणावत (२९४), कीर्ती राणा (२१४)
>सहा माजी संचालक : निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे, संजय पानसरे, शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, प्रभू पाटील, बाळासाहेब सोळसकर हे सहा संचालक पुन्हा निवडून आले असून उर्वरित १२ संचालक पहिल्यांदाच निवडून आले आहेत.