मुंबई : ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येने उशिरा का होईना, पण राज्य सरकारला जाग आली. गृहनिर्माण प्रकल्पांसाठीच्या परवानग्यांचे सुलभीकरण आणि करपद्धतीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. महाराष्ट्र चेंबर्स आॅफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे पदाधिकारी तसेच मुंबई, ठाणे येथील बिल्डर्सच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी बांधकाम परवान्यांचे सुलभीकरण करण्याची मागणी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर गृहनिर्माण प्रकल्पांच्या परवानग्यांचे सुलभीकरण करण्यासंबंधी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत नगरविकास विभाग, महसूल विभागाचे अधिकारी, एमसीएचआय, क्रेडाई संस्थांचे पदाधिकारी असतील.सेवा हमी कायद्यांतर्गत आॅनलाईन केलेल्या ४६ सेवांचा वापर करून संबंधित यंत्रणेकडून त्यांना लागणाऱ्या परवानग्या विहीत मुदतीत मिळवून घेता येतील. याबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. गृहबांधणी प्रकल्पांसाठी विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत परवाने पद्धत प्रक्रिया जलदगतीने व्हावी (आॅटो डिसीआर) यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
आत्महत्येनंतर सरकारला आली जाग
By admin | Published: October 14, 2015 4:07 AM