सर्पमित्राची कमाल! सापाच्या ८१ अंड्यांची २४ दिवस काळजी घेऊन पिलांना दिले जीवदान
By नामदेव मोरे | Published: April 22, 2024 06:08 PM2024-04-22T18:08:15+5:302024-04-22T18:09:10+5:30
प्रजननानंतर सर्व ८१ दिवड जातीच्या सापाच्या पिलांना सुखरूपपणे खाडीकिनाऱ्यावरील जंगलात सोडण्यात आले आहे.
नवी मुंबई : उलवे येथील बांधकाम साईटवर २९ मार्चला सापाची ८१ अंडी सापडली होती. सर्पमित्र अक्षय डांगे यांनी सर्व अंडी सुखरूप ठिकाणी ठेवून २४ दिवस त्यांची काळजी घेतली. प्रजननानंतर सर्व ८१ दिवड जातीच्या सापाच्या पिलांना सुखरूपपणे खाडीकिनाऱ्यावरील जंगलात सोडण्यात आले आहे.
इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना दिवड जातीचा साप दिसला. बांधकामासाठी सुरू असलेल्या हालचालीमुळे तो तेथून निघून केला. त्या ठिकाणी त्याची अंडी दिसली. काही दक्ष नागरिकांनी सर्पमित्र अक्षय डांगे यांना याविषयी माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अंडी अत्यंत नाजूक होती. त्यांना व्यवस्थितपणे ताब्यात घेऊन एका डब्यात ती उबविण्याची प्रक्रिया सुरू केली. नैसर्गिकपणे ६० दिवसांमध्ये साप अंड्यातून बाहेर येतात. पण अंडी ठेवून किती दिवस झाले याची माहिती नसल्यामुळे त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. २४ दिवसांनंतर सर्व ८१ अंड्यांमधून साप सुखरूप बाहेर आले. सर्वच्या सर्व पिल्ले सुखरूप असल्यामुळे सर्पमित्रांनीही समाधान व्यक्त केले. दिवड जातीच्या बिनविषारी जातीच्या सापाची ही पिल्ले खाडीकिनाऱ्यावरील जंगलात सुखरूपपणे सोडून दिली आहेत.
अशी उबविली अंडी
सापाची सापडलेली ८१ अंडी उबविण्यासाठी एक डब्यामध्ये ठेवली. त्यामध्ये कोकोपीट टाकून डब्यात ऑक्सिजन जाण्यासाठी काही ठिकाणी छिद्र केली. २४ दिवस सातत्याने ३० डिग्री तापमान राहिल याची काळजी घेतली. योग्य तापमान राखल्यामुळे सर्व अंड्यातून साप सुखरूप बाहेर येऊ शकले.
बांधकामाच्या ठिकाणी सापडलेली अंडी सुखरूप घरी नेऊन ती योग्य तापमानात उबविण्याची प्रक्रिया पार पाडली. सर्व ८१ अंड्यांतून दिवड सापाची पिले सुखरूपपणे बाहेर आल्याचे समाधान आहे. सर्व पिलांना सुरक्षित अधिवासात सोडले आहे.
अक्षय डांगे, सर्पमित्र