पनवेल:दहा वर्षापेक्षा जास्त काळापासुन प्रतीक्षा लागलेल्या नवी मुंबईमेट्रो अखेर दि.17 रोजी कोणत्याही सोपस्काराशिवाय बेलापूर ते पेंधर दरम्यान धावली.11 स्थानकांच्या या प्रवासात मेट्रोच्या वतीने गुलाबाचे फुल देऊन प्रवाशांचे स्वागत केले.यावेळी मेट्रोला देखील फुलांनी सजवले होते.
पहिल्याच दिवशी या सेवेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.मोठ्या संख्येने नागरिकांनी मेट्रोचा पहिला सफर अनुभवाला.सिडकोने अचानक मेट्रो सेवा सुरु करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले.विशेष म्हणजे पहिला मेट्रो प्रवास अनुभवण्यासाठी प्रत्येक मेट्रो स्टेशनवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.मेट्रोच्या चार टप्प्यापैकी पहिला टप्पा बेलापूर ते पेंधर हा 11.10 किमी लांबीच्या हा मार्ग आहे. एकूण 11 स्थानकांचा हा मार्ग आहे.आजच्या मेट्रो सेवे दरम्यान शिवसेना (शिंदे गट) वतीने ऍडव्होकेट प्रथमेश सोमण,रामदास शेवाळे यांच्या वतीने मेट्रोत शक्तिप्रदर्शन करताना दिसून आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांचे पोस्टर मेट्रोत झळकाविण्यात आले.
याव्यतिरक्त उद्धव ठाकरे गटाचे बबनदादा पाटील,माजी नगरसेवक हरेश केणी, राष्ट्रवादीचे फारूक पटेल यांनी मेट्रोत प्रवास केला.शुक्रवारी दुपारी 3 वाजता मेट्रो प्रवासी सेवाला सुरुवात झाली.रात्री 10 वाजता मेट्रोची शेवटची फेरी असणार आहे.दुसऱ्या दिवशी दि.18 रोजी पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे.नवी मुंबई मेट्रोसाठीचे डबे हे थेट चीन मधून नवी मुंबईत दाखल झालेले आहेत.अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे असून मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ) अशी व्यवस्था करण्यात आली आहे.