बुलडाणा अपघातानंतर खासगी बसची सुरक्षा नियमावली ऐरणीवर

By नारायण जाधव | Published: July 1, 2023 03:12 PM2023-07-01T15:12:18+5:302023-07-01T15:12:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातात २५ ...

After the Buldana accident, the safety regulations of private buses are on the agenda | बुलडाणा अपघातानंतर खासगी बसची सुरक्षा नियमावली ऐरणीवर

बुलडाणा अपघातानंतर खासगी बसची सुरक्षा नियमावली ऐरणीवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर राज्यातील खासगी बसवाहतूकदारांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, वाहतूक आरटीओसह पोलिसांकडून त्यांना मिळणारे पाठबळ हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बुलडाण्यातील पिंपळखुटा येथे झालेल्या अपघातात समृद्धी महामार्गाची रचना जितकी दोषी आहे, त्याहून अधिक खासगी बसवाहतूकदारांकडून होणारे नियमांचे उल्लंघन कारणीभूत आहे. राज्यच नव्हे तर संपूर्ण देशभरात बहुसंख्य खासगी बसमधून मालवाहतूक केली जात आहे. यात साधारणत: एका लक्झरी बसच्या टपावर आणि मागील बाजूच्या भल्या मोठ्य़ा डीकीमधून सुमारे दोन ते पाच टन माल वाहून नेला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बस प्रवाशांसाठी आहेत की, मालवाहतुकीसाठी असा प्रश्न पडतो.

याची चौकशी होणे गरजेचे
याशिवाय बसच्या चालक - क्लिनरला बहुतेक बसवाहतूकदार प्रशिक्षण देत नाहीत. ज्या बसला अपघात झाला, तिला वाहन योग्यता प्रमाणपत्र अर्थात फिटनेस / सेफ्टी सर्टिफिकेटसह पीयुसी प्रमाणपत्र होते की नाही, याची चौकशी होणे गरजे आहे. तसेच गाडीत अग्निशमन यंत्र आणि काच फोडण्यासाठी बंधनकारक असलेले हॅमर नसल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर जास्त मृत्यू होण्याचे कारण म्हणजे काचबंद एसी बसमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवासी सुरक्षिततेच्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व असते तर टायर फुटून बस पुलावर धडकून इंधन टाकी फुटून आग लागून २५ प्रवाशांचा जो मृत्यू झाला आहे, ती संख्या कमी करता आली असती.

न्यायालयाचे आदेश धाब्यावर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बसच्या टपावरून मालवाहतूक करण्यास मनाई आहे. शिवाय डीकीमध्ये जो माल ठेवण्यात येतो, तो किती ठेवावा, कशा पद्धतीने ठेवावा, वळणावर तो हलून बस एका बाजून झुकून अपघात होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवाशांचे सामान बसच्या बाजूला किंवा मागील बाजूच्या कक्षातच ठेवण्याचे आदेश आहेत. परंतु, सध्या लक्झरी बसच्या टपावरून जी मालवाहतूक केली जात आहे, ती पूर्णत: अवैध आहे. यामुळे वेगात असलेल्या बसच्या टपावरील जड सामान खाली पडून बाजूने जाणाऱ्या अन्य वाहनचालकांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

गोदामांची झडती घ्यायला हवी

आज अनेक खासगी बसचालकांची गोदामे असून, ते वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या साक्षीने बसमध्ये माल भरतात. शीव - पनवेल महामार्गावर चेंबूरनाका, सानपाडा परिसरात असे दृश्य नेहमीच दिसते. राज्यातील इतर मोठ्या शहरांच्या वेशीवरही गोदामांची झडती घेतली तरी अशी गोदामे सापडतील.

Web Title: After the Buldana accident, the safety regulations of private buses are on the agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात