नवी मुंबई :-डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा प्रादूर्भाव झाल्यामुळे 2018 पासून अमेरिकेने भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. त्यानंतर केंद्र सरकार, प्लांट कॉरंटाईन इंडिया यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून ही निर्यात बंदी उठवावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांमुळे 2022 पासून ही निर्यात बंदी उठविण्यात आली. मात्र त्यासाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार डाळिंबाच्या विकेंद्रीकरणाची प्रकिया करून गुरूवारी प्रायोगिक तत्त्वावर डाळिंबाचे 450 खोके म्हणजे 150 किलो डाळिंब विमानाने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पाठविण्यात आले.
नवी मुंबईतल्या तुर्भे इथल्या अपेडा कार्यालयाच्या जनरल मॅनेजर विनिता सुधांशू यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मुंबई प्रादेशिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, मुंबई विभागाचे प्रमुख ब्रजेश मिश्रा, कृषी पणन मंडळाचे मिलिंद जोशी, चेरमन अभिषेक देव, अपेडाच्या जनरल मॅनेजर विनिता सुधांशू , उपसंचालक ब्रिजेश मेहता, अमेरिकेच्या इन्सपेक्टर डॅग्नी वॅझेक्युझ, विकीरण सुविधा केंद्र प्रमुख सतिश वाघमोडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, डाळींब संशोधन केंद्र सोलापूर चे डॉ. निलेश गायकवाड, डॉ. जी पी सिंग, एन.आर सीचे संचालक डॉ.मराठे, महाराष्ट्र स्टेट ॲग्रीक्लचर मार्केटीग बोर्डचे संचालक संजय कदम, आय एन आय फॉम मुंबईचे संचालक पंकज खंडेवाल आदी उपस्थित होते.
या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत. तिथल्या त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणाऱ्या मार्गदर्शक डाएट मध्ये डाळिंबाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत डाळिंबाला मोठी मागणी आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. भारतीय डाळिंबांनी ही बाजारपेठ काबीज केल्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे अपेडाचे मुंबई प्रादेशिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक यांनी सांगितले.