आमदार कपिल पाटील यांच्या भेटीनंतर सागर गोरखेंचे उपोषण मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 07:00 PM2022-05-27T19:00:26+5:302022-05-27T19:02:59+5:30
कारागृतील समस्याची माहिती पाटील यांनी घेतल्यानंतर गोरखे यांनी सातव्या दिवशी आपले उपोषण सोडले.
वैभव गायकर
पनवेल - तळोजा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. पुरेसा पाणी मिळत नसल्यामुळे एल्गार परिषदेचे सागर तात्याराम गोरखे या कैद्याने आमरण उपोषण घोषित केले होते. या विषयावरून आमदार कपिल पाटील यांनी शुक्रवारी गोरखे यांची भेट घेतली. कारागृतील समस्याची माहिती पाटील यांनी घेतल्यानंतर गोरखे यांनी सातव्या दिवशी आपले उपोषण सोडले.
कपिल पाटील यांनी भेट घेतल्यावर गोरखेनी आपले उपोषण मागे घेतले. यासंदर्भात पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना यासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांनी कपिल पाटील यांना आश्वासन दिले आहे. कारागृहातील पाणीपुरवठ्याचा विषय सिडकोशी निगडिट असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. त्यानुसार सिडको प्रशासन पाणीपुरवठा पुरवत करणार आहे. दुसरा विषय आरोग्याशी निगडित असून कैद्यांना उद्यापासून कोविडचे दुसरे डोस दिले जाणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.
कारागृहाबाहेर कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना बसण्यासाठी प्रतिक्षालय नाही. याबाबत स्थानिक आमदारांना आमदार निधीतून हे प्रतिक्षालय उभारण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. उपोषण छेडलेल्या सागराला याव्यतिरिक्त कोणताच त्रास नसल्याचे आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.
तळोजा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. हजारापेक्षा जास्त कैद्यांचा अतिरिक्त भरणा कारागृहात करण्यात आल्याने त्याचा परिणाम संपूर्ण कारागृहावर पडत आहे. विशेष म्हणजे अंडासेलमधील व्हीआयपी कैद्याच्या तुलनेत सर्वसामान्य कैद्यांना सोयी सुविधा मिळत नाहीत.याबाबत कोणीही बोलण्यास पुढे येत नाही.
राज्यातील सर्वच कारागृहात सोयी सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने राज्यशासनाला पत्र लिहिणार आहे. माझ्या भेटीनंतर सागर गोरखे यांनी सातव्या दिवशी उपोषण सोडले आहे.
- कपिल पाटील (आमदार )