दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सात फुटी जखमी अजगराचा जीव वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:05 PM2022-12-04T16:05:08+5:302022-12-04T16:05:16+5:30
भक्षाच्या शोधात आलेला आणि जाळ्यात अडकून जखमी अवस्थेतील सात फुटी अजगरावर पुणे येथील रेस्क्यु इस्पीतळात यशस्वीपणे शस्त्रक्रिया
मधुकर ठाकूर
उरण : भक्षाच्या शोधात आलेला आणि जाळ्यात अडकून जखमी अवस्थेतील सात फुटी अजगरावर पुणे येथील रेस्क्यु इस्पीतळात यशस्वीपणे
शस्त्रक्रिया करून त्याला वाचविण्यात यश आले असल्याची माहिती उरण वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांनी दिली.
उरण तालुक्यातील चिरनेर येथील एका शेतकऱ्याच्या शेत तळ्यावर पायथॉन जातीचा अजगर भक्षाच्या शोधार्थ आला होता.सात फुटी अजगर संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात अडकून पडला होता. जाळ्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला होता.याची माहिती मिळताच फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत ठाकूर, सृष्टी ठाकूर , गौरव वशेणीकर यांनी शेतावर जाऊन पाहणी केली.
सर्पमित्रांना सात फुटी लांबीचा अजगर जाळ्यात अडकून गंभीररीत्या जखमी अवस्थेत आढळून आला.त्यांनी सुरी, चाकूने जाळे कापून या जखमी अवस्थेतील अजगराला जाळ्यातून बाहेर काढले. अजराला नायलॉनच्या धाग्यामुळे मोठं मोठ्या जखमा झाल्या होत्या.शस्त्रक्रियेशिवाय जखमी अजगराचा जीव वाचणे अवघड असल्याचे स्पष्ट झाल्याने या घटनेची माहिती सर्पमित्रांनी तत्काळ उरण वनविभागाला दिली.त्यानंतर वनखात्याचे भाऊसाहेब डिविलकर, वनरक्षक संतोष इंगोले,राजेंद्र पवार यांनी या जखमी अजगराला उपचाराच्या व संवर्धनाच्या दृष्टीने ताब्यात घेतले. उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यूअर्सच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते.शनिवारी अजगरावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अजगराचा जीव वाचवण्यात यश आले असल्याची माहिती उरण वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांनी दिली.