बाळाराम पाटील यांच्या विजयानंतर शेकापला नवसंजीवनी !
By Admin | Published: February 8, 2017 04:19 AM2017-02-08T04:19:11+5:302017-02-08T04:19:11+5:30
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत पुरोगामी शिक्षक आघाडीचे बाळाराम पाटील यांनी
वैभव गायकर, पनवेल
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत पुरोगामी शिक्षक आघाडीचे बाळाराम पाटील यांनी ४,९५० मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. यामुळे पनवेल तालुक्यात शेकापच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. विशेष म्हणजे नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना या विजयाचा शेकापला नक्कीच फायदा होणार आहे.
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका संपल्यानंतर महापालिकेतील इच्छुक उमेदवारांच्या तिकीट वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच प्रभागवार उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पनवेलमध्ये शेकापचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून भाजपाकडे पाहिले जाते. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुरांमुळे भाजपाची बाजू उजवी ठरत आहे. मात्र शेकापला देखील बाळाराम पाटील यांच्या रूपाने आमदार मिळाल्याने शेकापमध्ये जल्लोषाचे वातावरण असून विशेष करून पक्षाला ग्रामीण भागात नवसंजीवनी मिळाली आहे.
बाळाराम पाटील यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तिकीटवाटपात शेकापला राष्ट्रवादीला नाराज करून चालणार नाही. पनवेल महापालिकेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या निवडणुकांची सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे. यात भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत, तर शेकापने राष्ट्रवादी, काँग्रेसबरोबरच महाआघाडी केली आहे.