बारणेंच्या विजयानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांचा मार्ग मोकळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:59 AM2019-05-24T00:59:14+5:302019-05-24T01:01:32+5:30
विधानसभेची सेमीफायनल; राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू; शहरी मतदारांमुळे मताधिक्य वाढले
- वैभव गायकर, पनवेल
मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे विक्रमी दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. हा त्यांचा या मतदारसंघातील दुसरा विजय आहे. मात्र, या वेळी मतांमध्ये मिळालेली आघाडी विक्रमी असल्याने युतीला येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत चांगले दिवस येतील, असे मानले जात आहेत. लोकसभा मतदारसंघातील पनवेल या सर्वात मोठ्या विधानसभा क्षेत्रातील बारणेंना सुमारे ५४ हजारांचे मताधिक्य मिळाले असल्याने या मताधिक्याच्या आधारे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल असल्याने दोन्ही पक्षांनी प्रचारात जोर धरला होता. पनवेलमध्ये सेनेच्या जोडीला भाजप, तर राष्ट्रवादीच्या जोडीला शेकाप ठामपणे उभे होते. लोकसभेच्या आडून भविष्यातील विधानसभा निवडणुकीची चाचपणी भाजप व शेकाप करीत होते. मात्र, मावळमधील निकाल राष्ट्रवादीसह शेकापला धक्कादायक आहे. पनवेलमध्ये श्रीरंग बारणे यांच्यापेक्षा पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, निकाल पाहता, पनवेलमध्ये प्रचंड प्रमाणात मोदी लाटेचा फटका पार्थ पवार यांना बसला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा १४ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारालाही १८ हजार मते मिळाली होती.
विधानसभा निवडणूकदेखील या वर्षीच पार पडणार आहे. बारणेचे पनवेलमधील मताधिक्य पाहता, प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होणार हे निश्चित. पनवेलमध्ये शेकापच्या मार्फत पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू आहे. मात्र, राजकीय गणिते पाहता, शेकापचा विधानसभा निवडणुकीत चांगलाच कस लागण्याची शक्यता आहे.
पनवेलमध्ये शेकापचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, कालांतराने शहरी मतदारांमध्ये वाढ झाल्याने त्याचा फटका हळूहळू शेकापला विविध ठिकाणी बसला आहे. सध्याच्या घडीला महापालिकेत भाजप सत्ताधारी आहे, तर शेकाप मित्रपक्ष विरोधी पक्षात बसले आहेत. विधानसभेत विजय संपादित करण्यासाठी शेकापला मोठ्या प्रमाणात संघटनात्मक पातळीत काम करावे लागणार आहे. विशेषत: शहरी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. लोकसभा निवडणूक विधानसभेची सेमी फायलन पाहिली जात असताना सेनेच्या उमेदवाराला पनवेलमधून मिळालेली ५४ हजारांची लीड पाहता विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना येऊ घातलेल्या विधानसभेसाठी होणार, असे राजकीय विश्लेषक मत व्यक्त करीत आहेत.