डम्पिंग ग्राउंडविरोधात पुन्हा आंदोलन
By admin | Published: March 25, 2017 01:44 AM2017-03-25T01:44:17+5:302017-03-25T01:44:17+5:30
तळोजा औद्योगिक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला सिडकोचा घनकचरा प्रकल्प शुक्रवारी सुरू करण्यात आलेला होता.
तळोजा : तळोजा औद्योगिक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला सिडकोचा घनकचरा प्रकल्प शुक्रवारी सुरू करण्यात आलेला होता. मात्र, सद्गुरू वामनबाबा संघर्ष समितीने हा प्रकल्प पुन्हा कचऱ्याच्या गाड्या अडवून बंद पाडला. जोपर्यंत प्रकल्पातून प्रदूषण कमी होण्याचे आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत हा प्रकल्प सुरू होऊ देणार नसल्याचे समितीचे अध्यक्ष धनाबुवा पाटील यांनी सांगितले आहे.
पनवेलचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी गुरुवारी प्रकल्प सुरळीत सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारपासून प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र, याबाबत पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्रदूषण आणि डम्पिंगमुळे आरोग्याच्या व्याधी उद्भवत असून स्थलांतर करावे,अशी मागणी समितीचे अध्यक्ष धनाबुवा पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)