सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला उसर्ली ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:07 AM2019-01-31T00:07:26+5:302019-01-31T00:08:45+5:30
अतिक्रमणविरोधी पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले
पनवेल : तालुक्यातील उसर्ली गावातील ग्रामस्थांच्या घरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सिडकोच्याअतिक्रमण विरोधी पथकाला बुधवारी रिकाम्या हाती परतावे लागले. नैना क्षेत्रात सिडकोने अनधिकृत बांधकामांना निष्कासित करण्याच्या मोहिमेला वेग दिला आहे. याकरिताच ही तोडक कारवाई नियोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांचा विरोध व अपुऱ्या पोलीसबळामुळे सिडकोला कारवाई पुढे ढकलावी लागली.
उसर्ली गावात नव्याने ही बांधकामे उभारण्यात आली होती. या बांधकामांची उभारणी करताना सिडकोच्या मार्फत कोणतीच परवानगी घेतली नसल्याने या बांधकामावर कारवाईसाठी सिडको प्रशासन पोलीस फौजफाट्यासह याठिकाणी दाखल झाले होते. एकूण चार इमारतींच्या बांधकामांना अनधिकृत असल्याने निष्कासित करण्याचे नियोजित होते. ग्रामस्थांचा विरोध व खांदेश्वर अपुरे पोलीसबळ यामुळे संबंधित कारवाई पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे अधिकारी एस.आर.राठोड यांनी दिली. यावेळी विरोध करण्यासाठी रहिवाशांनी रस्त्यांवर गाड्यांची पार्किंग केली होती. ग्रामस्थांच्या विरोधामुळे कारवाई पुढे ढकलण्यात आल्याची माहिती एस. आर. राठोड यांनी दिली. नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना सिडकोने टार्गेट केले आहे. नुकतीच हरिग्राम याठिकाणी तीनशे घरांची अनधिकृत चाळ सिडकोने पाडली होती.
चुकीच्या धोरणाचा त्रास
नैना प्रकल्प लादून सिडकोने स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला आहे. केवळ प्रकल्पग्रस्त नसून बाहेरील गरीब गरजंूनी देखील याठिकाणी घरे खरेदी केली आहेत. लाखो रुपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर असताना सिडको इमारत पूर्ण झाल्यावर कारवाई करीत असेल तर अनेकांना आपला जीव द्यावा लागेल अशी प्रतिक्रि या पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिली.
शेकापचा नैना क्षेत्रातील कारवाईला विरोध
एकीकडे शेकडो प्रकल्पग्रस्तांना सीसी, ओसी देण्यास सिडको उदासीनता दाखवत आहे. त्यामुळे येथील रहिवासी गरजेपोटी घरे बांधत आहेत. त्यामुळे सिडकोने आपले धोरण स्पष्ट करावे त्यानंतरच नैना क्षेत्रात कारवाई करावी अशी भूमिका शेकाप नेते आर.डी. घरत व विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी घेतली.