सिडको विरोधातील जासईतील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 10:05 PM2022-09-27T22:05:14+5:302022-09-27T22:05:26+5:30

गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद पडल्याने खारकोपर -उरण १४.३ किमी लांबीचा दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडणार ! 

Aggressive farmers in Jasai against CIDCO on railway track work | सिडको विरोधातील जासईतील शेतकरी आक्रमक

सिडको विरोधातील जासईतील शेतकरी आक्रमक

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : खारकोपर -उरण १४.३ कि.मी.लांबीचा रेल्वे मार्गाचे काम मागील काही दिवसांपासून रखडले आहे. सिडकोने  संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला, भुखंड वाटप देण्यास दिरंगाई केल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम       प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने बंद पडले आहे.आधी आश्वासनांची पूर्तता त्यानंतरच काम अशी ठाम भूमिका जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतली असल्याची माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली. 

  सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.त्यानंतर उर्वरित गव्हाण,रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेशन उभारणी, रेल्वे ट्रॅक टाकणे, ओव्हरहेड वायर, उड्डाण पूल उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.या प्रगतीपथावरील कामांच्या जोरावरच रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर २०२२ प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन दिली होती.मात्र वारंवार दिलेल्या हेडलाईन्स पाळण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता नव्याने २०२३ म्हणजे पुढील वर्षाची डेडलाईन
जाहीर केली आहे.
 मात्र खारकोपर-उरण या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम जोरदार सुरू असतानाच जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाच्या कामालाच विरोध करत अडथळा निर्माण केला आहे.आधी सिडकोने आश्वासन दिल्याप्रमाणे ३२ शेतकऱ्यांना भुखंडाचे वाटप , मोबदला द्या त्यानंतरच काम सुरू करा.अशी कठोर भूमिका जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतली असल्याची माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या सिडकोच्या विरोधातील संतप्त भुमिकेमुळे गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम काही दिवसांपासून ठप्प पडले आहे. परिणामी खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांना  नेरुळ - उरण  रेल्वे मार्गावर रेल्वे धावण्याची आणखी वाट पहावी लागते की काय अशीही भीती उरणकरांना लागुन राहिली  आहे.

Web Title: Aggressive farmers in Jasai against CIDCO on railway track work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.