पालिकेच्या वाशी रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन, ठेकेदाराने सानुग्रह अनुदान कमी दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 01:49 PM2021-10-30T13:49:00+5:302021-10-30T13:49:13+5:30
Navi Mumbai : कामगारांना ठेकेदाराने जवळपास ५ हजार रुपये कमी सानुग्रह अनुदान दिले आहे. मागणी करूनही ठेकेदार लक्ष देत नसल्यामुळे कामगारांनी आराेग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले.
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील सफाई कामगारांना सानुग्रह अनुदान व रजारोखीकरणाची रक्कम कमी देण्यात आली आहे. यामुळे संतापलेल्या कामगारांनी आरोग्य अधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले.
प्रथम संदर्भ रुग्णालयात जवळपास १९१ कर्मचारी काम करत आहेत. कामगारांना ठेकेदाराने जवळपास ५ हजार रुपये कमी सानुग्रह अनुदान दिले आहे. मागणी करूनही ठेकेदार लक्ष देत नसल्यामुळे कामगारांनी आराेग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले.
कामगारांच्या हक्काची रजा रोखीकरणाची पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. विशेष राहणीमान भत्यातील थकबाकीही दिलेली नाही. ठेकेदाराच्या कामाची मुदत संपली आहे. मनपा प्रशासनाने त्याला बिलाची पूर्ण रक्कम देण्यापूर्वी कामगारांची काही देणी शिल्लक आहेत का? याची शहानिशा करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता त्यांची पूर्ण रक्कम देण्यात आली आहे. आता कामगारांचे पैसे कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समाजा समता कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. संघटनेचे पदाधिकारी मंगेश लाड, गजानन भोईर, महेंद्र पाटील, भाेलेश्वर भोईर, संतोष पाटील, अरुण आहेर व इतर पदाधिकारीही आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते. कामगारांच्या शिष्टमंडळाने मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांचीही भेट घेऊन त्यांना सर्व प्रश्न समाजावून सांगितले.
सोमवारी ठेकेदाराबरोबर चर्चा करून सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्य आरोग्य अधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.