नवी मुंबईत सकल मराठा समाजाची निदर्शने
By नामदेव मोरे | Published: February 16, 2024 07:58 PM2024-02-16T19:58:14+5:302024-02-16T19:58:41+5:30
अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नामदेव मोरे/ नवी मुंबई : सकल मराठा समाज व मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपाेषणाची योग्य दखल घेतली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शासनाने सगेसोयऱ्यांना कुणबी दाखले देण्याविषयी दिलेल्या अद्यादेशाचे व इतर अश्वासनांची पुर्तता करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यातील समल मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारने आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही. यामुळे नाराज झालेल्या सकल मराठा समाज व मराठा उद्योजक लॉबीच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी वाशीतील शिवाजी चौकात निदर्शने केली.
सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारने चालढकल करू नये. मराठा समाजाला कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही दाखले मिळावे यासाठी काढलेल्या अद्यादेशाचे लवकर कायद्यात रूपांतर करावे. विशेष अधिवेशनात कायदा तयार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने दुर्लक्ष सुरूच ठेवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.