कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन, आॅल कार्गोच्या व्यवस्थापनाने १३१ कामगारांना केले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:26 AM2019-02-07T03:26:33+5:302019-02-07T03:26:52+5:30
उरण तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो सीएफएसमधील कमी केलेल्या ७४ कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप, काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्यावर बुधवारी गेटबंद आंदोलन करण्यात आले.
उरण : तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो सीएफएसमधील कमी केलेल्या ७४ कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप, काँग्रेस आणि मनसेच्या पाठिंब्यावर बुधवारी गेटबंद आंदोलन करण्यात आले.
जून २०१७ ला कोणतेही कारण न देता, या कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक १३१ कामगारांना कामावरून कमी केले आहे. सर्वपक्षीयांनी व कामगारांनी अनेक वेळा आंदोलने करूनदेखील मुजोर प्रशासनाने फक्त आश्वासने देऊन कामगारांची आंदोलने मागे घेण्यास भाग पाडले. या कामगारांमध्ये बहुसंख्य ९४ कामगार हे प्रकल्पग्रस्त आहेत. या ठिकाणी ही कंपनी उभारण्यासाठी येथील लोकांनी आपल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी कवडीमोलाने या कंपनीला दिल्या. आपल्या मुलांना, नातेवाइकांना या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकºया मिळतील, या आशेने या जमिनी कंपनीला कवडीमोल भावात दिल्या होत्या. मात्र, कंपनीच्या मालकांनी जून २०१७ मध्ये १३१ कामगारांना कामावरून कमी केले.
यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. मात्र, २० महिने झाले तरी या कामगारांना आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. एवढे दिवस नोकरी नसल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता या कामगारांनी आरपार लढाई करण्याचे ठरविले आहे. बुधवारी सकाळपासूनच गेटबंद आंदोलनाला सुरु वात करण्यात आली आहे. जोपर्यंत कंपनीचे संचालक, अधिकारी येथे चर्चेला येणार नाहीत आणि कामगारांना परत कामावर घेतले जाण्याचे ठोस आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत कंपनीसमोर गेटबंद आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या गेटबंद आंदोलनामुळे कंटेनर वाहतूक ठप्प झाली आहे.
या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, राजिप सदस्य बाजीराव परदेशी, वैजनाथ ठाकूर, राजिप सदस्य विजय भोईर, मनसेचे तालुकाध्यक्ष अभिजित कडू, काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संध्या ठाकूर, मनसेच्या ज्योती मालवणकर, जयंत गांगण, रूपेश पाटील, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.