अग्नितांडव १० तास

By admin | Published: July 6, 2015 06:05 AM2015-07-06T06:05:33+5:302015-07-06T06:05:33+5:30

पावणे एमआयडीसी येथील सोनी डीएडीसी कंपनीत आग लागल्याची घटना रविवारी घडली. कंपनी बंद असल्याने जीवितहानी टळली.

Agnianthav 10 hours | अग्नितांडव १० तास

अग्नितांडव १० तास

Next

नवी मुंबई : पावणे एमआयडीसी येथील सोनी डीएडीसी कंपनीत आग लागल्याची घटना रविवारी घडली. कंपनी बंद असल्याने जीवितहानी टळली असली तरी कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. परंतु आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सोनी डीएडीसी या कंपनीत सकाळी ७.१०च्या सुमारास आग लागली. कंपनीचा फायर अलार्म वाजल्याने सुरक्षारक्षकाने तत्काळ एमआयडीसी अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली. त्यानुसार पावणे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परंतु आग वाढतच चालल्याने महापालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या अग्निशमन दलांच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. या वेळी कंपनीचे दोन मजले आगीने पूर्णपणे घेरले गेले. अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी या आगीला महत्त्वाचा कॉल घोषित केला. त्यानुसार ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, सिडको, ओएनजीसी यांचे १३ बंब घटनास्थळी दाखल झाले. १०० हून अधिक अग्निशमन कर्मचारी आग विझवण्यात गुंतले होते. १० तासांनी संध्याकाळी ५ वाजता ही आग आटोक्यात आली. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरूच होते, असे राणे यांनी सांगितले.
या ठिकाणी आॅप्टिकल डिस्क, सीडी, डीव्हीडी, कॉम्पॅक्ट डिस्क, डिजिटल व्हिडीओ डिस्क आदी तयार होत असे. ही उत्पादने देश - विदेशात पाठवले जात असल्याने कंपनीत त्याचा मोठा साठा होता. परंतु कंपनीला शनिवार-रविवार सुटी असल्याने आग लागली तेव्हा कामगार उपस्थित नव्हते. कामगार असताना आग लागली असती तर सुमारे ७० हून अधिक कामगारांचा जीव धोक्यात आला असता. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले. परंतु धूर बाहेर पडण्यासाठी जागाच नसल्याने तो आतच कोंडला गेला. या धुरामुळे कंपनीच्या आत जाऊन आग विझवण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. सुरुवातीला आॅक्सिजन सिलिंडरसोबत घेऊन ते आत शिरले. परंतु कंपनीत सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे काहीच दिसत नसल्याने त्यांना परत बाहेर यावे लागले.
अखेर कोंडलेला धूर बाहेर काढण्यासाठी तसेच आतमध्ये पाण्याचा मारा करण्यासाठी खिडक्यांच्या काचा फोडाव्या लागल्या. कंपनीच्या यूपीएस रूममध्ये आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, आगीचे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, वरिष्ठ निरीक्षक चंद्रसेन देशमुख, वाहतूक पोलीसहेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.
कंपनीच्या काही अंतरावरूनच उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. कंपनीतून निघणाऱ्या ज्वाळांमुळे ही वाहिनी पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवाय अग्निशमनाच्या कामातही अडथळा येत होता.
त्यामुळे वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Agnianthav 10 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.