आगरी कोळी महोत्सवास सुरुवात
By admin | Published: January 6, 2017 05:48 AM2017-01-06T05:48:46+5:302017-01-06T05:48:46+5:30
अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. ठाणेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
नवी मुंबई : अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. ठाणेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. १२ दिवस सुरू राहणाऱ्या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नेरूळ सारसोळे येथील श्री गणेश रामलीला मैदानामध्ये हा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. ११ वर्षांपासून सुरू असलेल्या उत्सवाला नवी मुंबई महोत्सवाचे स्वरूप आले आहे. खासदार राजन विचारे यांनी या वेळी आयोजक नामदेव भगत यांचे कौतुक केले. भूमिपुत्रांची संस्कृती व इतिहास जपण्याचे काम महोत्सवाच्या माध्यमातून सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनीही आगरी कोळी महोत्सवामुळे संस्कृती व कलेचे जतन होत असल्याचे मत व्यक्त केले.
महोत्सवामध्ये १२ दिवस आगरी कोळी गीते, भजन व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्थानिक आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडवितानाच महाराष्ट्राच्या कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. भूमिपुत्रांचा इतिहास व संघर्षाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमा वेळी आयोजक नामदेव भगत, मनोहर गायखे, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, मोरेश्वर पाटील, विजय माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)