अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स २४५० कोटी खर्चुन करणार सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास
By नारायण जाधव | Published: May 4, 2023 08:47 PM2023-05-04T20:47:59+5:302023-05-04T20:49:13+5:30
त्यात २००० कोटींचा खर्च नमूद केला होता.
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अग्रगण्य अभियांत्रिकी आणि बांधकाम कंत्राटदार अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्सने मुंबईच्या प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या पुनर्विकासाची ऑर्डर जिंकली आहे. रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने त्यांची सर्वात कमी दराची २४५० कोटींची निविदा मंजूर केली आहे. हा पुनर्विकास प्रकल्प ३० महिन्यांत पूर्ण करायचा आहे. रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ऑक्टोबर २०२२मध्ये निविदा मागविल्या हाेत्या. त्यात २००० कोटींचा खर्च नमूद केला होता.
स्पर्धेत होत्या चार कंपन्या
लार्सन ॲन्ड टुर्बो, ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शनस आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शनस कंपनी शर्यतीत होते. १५ मार्च २०२३ रोजी तांत्रिक बोली उघडल्यानंतर १२ एप्रिल २०२३ रोजी आर्थिक बोली उघडण्यात आल्या. त्यात अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्सची निविदा सर्वात कमी दराची होती.
हेरिटेज आराखड्यात बदल नाहीत. स्थानकाच्या गॉथिक शैलीतील हेरिटेज इमारतीत कोणतेही मोठे बदल केले जाणार नाहीत, याची काळजी कंत्राटदार कंपनीने घ्यायची आहे. कारण हे स्थानक युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे.
या असतील सुविधा
पुनर्विकास कामाच्या व्याप्तीमध्ये स्थानक इमारती आणि संबंधित पायाभूत सुविधांसाठी नागरी कामे करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने एक प्रतिष्ठित दर्शनी भाग, अति-आधुनिक स्टेशन इमारती, हेरिटेज इमारतींचे नूतनीकरण, उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म आणि कनेक्शन यांचा समावेश आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले मंडई पासून स्कायवॉकद्वारे जोडण्यात येणार आहे. पुनर्विकसित सीएसएमटी स्थानकात सर्व प्रवासी सुविधांसह रिटेल, कॅफेटेरिया आणि मनोरंजनाच्या सुविधांसह एक प्रशस्त छताचा प्लाझा बांधण्यात येणार आहे. यात फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, स्थानिक उत्पादने विकण्यासाठी दुकाने असणार आहेत. स्थानकात पुरेशी रोषणाई, मार्ग शोधक/चिन्हे, लिफ्ट्स/एस्केलेटरसह वाहनतळाच्या पुरेशा सुविधांसह वाहतूक सुरळीत होण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे.