सात ट्रान्सफॉर्मरमधील आॅइल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:25 AM2018-10-03T03:25:46+5:302018-10-03T03:26:13+5:30
ट्रान्सफॉर्मर स्फोटाच्या घटना : पनवेलमध्ये एका वर्षात २२२० लीटर आॅइल गायब
नवी मुंबई : महावितरणच्या पनवेल परिसरातील चार शाखांच्या अंतर्गत असलेल्या सात ट्रान्सफॉर्मरमधून आॅइल चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. एका वर्षामध्ये तब्बल २२२० लीटर आॅइलची चोरी झाली असून, त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊन मोठे नुकसान झाले आहे. या विषयी तळोजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर २०१७ ते २४ आॅगस्ट २०१८ दरम्यान चोरट्यांनी न्यू केमिकल झोन प्लॉट नंबर ३५, एमआयडीसी प्लॉट नंबर ८४, प्लॉट नंबर ९०, ३०, देवीचा पाडा व राहिंजन स्वर्गद्वार येथील ट्रान्सफॉर्मरमधून आॅइल चोरी झाली असल्याची तक्रार पनवेल उपविभाग एक चे उपकार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांनी दिली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नावडा, तळोजा ग्रामीण व एमआयडीसीच्या दोन, अशा एकूण चार शाखा आहेत. केमिकल झोनमधील विद्युत पुरवठा २५ डिसेंबर २०१७ ला बंद पडला होता. प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे प्रोटेक्शन फ्युज उडून पडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी २०० लीटर आॅइल चोरी केल्याचे निदर्शनास आले. एमआयडीसी २ मधील प्लॉट नंबर ८४ येथील ट्रान्सफॉर्मरमधून ३० डिसेंबर २०१७ मध्ये ३०० लीटर आॅइल चोरी झाले. प्लॉट नंबर एल ९० मधून ७०० लीटर व एल ३० मधून ४०० लीटर आॅइलची चोरी झाली होती.
नावडे शाखेच्या अंतर्गत देवीचा पाडा येथील ट्रान्सफॉर्मरमधून १३ एप्रिल २०१८ ला २०० लीटर आॅइल चोरीला गेले आहे. तळोजा ग्रामीण शाखेच्या अंतर्गत येत असलेल्या रोहिंजन येथून ४२० लीटर आॅइलची चोरी झाली आहे. डिसेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ मध्ये सात ट्रान्सफॉर्मरमधून तब्बल चार लाख ४४ हजार रुपये किमतीचे २२२० लीटर आॅइल चोरीला गेले होते. आॅइलचोरीमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊन परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व घटनांप्रकरणी संबंधित विभागाच्या सहायक अभियंत्यांनी पोलीस स्टेशनला तक्रारी देऊन वरिष्ठांना माहिती दिली होती. या तक्रारीवरून अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांनी तळोजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.