नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशपातळीवर नावलौकीक मिळविला आहे. स्वच्छतेची चळवळ कायम ठेवून देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा निर्धार नवनियुक्त आयुक्त कैलास शिंदे यांनी केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार डॉ. कैलास शिंदे यांनी गुरूवारी स्वीकारला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला उत्तम प्रशासकीय सेवा देण्यात येतील. अनेक आघाड्यांवर महानगरपालिकेने चांगले काम केले आहे. स्वच्छतेमध्ये देशपातळीवर ठसा उमठविला आहे. स्वच्छता सर्वेक्षणाच्या कामांवर लक्ष देण्यात येईल. सर्वांच्या सोबतीने देशात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देवून विकास कामांचा क्रम निश्चीत केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधून आवश्यक त्या सुचना दिल्या. यावेळी प्रशासन उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, सत्यवान उबाळे, जितेंद्र इंगळे, ललीता बाबर,डॉ. राहुल गेठे, सोमनाथ पोटरे व इतर अधिकारी उपस्थित होते.