नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा परिणाम भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर झाला आहे. मुंबईत मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये एका कोथिंबिरीच्या जुडीसाठी ६० ते ७५ रु पये मोजावे लागत आहेत. वाटाणा १०० ते १२० रुपये किलो झाला असून, फ्लॉवरसह शेवग्याच्या शेंगा, फरसबी व इतर भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
राज्यभर कोसळणाऱ्या पावसाचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनावरही झाला आहे. अनेक ठिकाणी भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी पडू लागला आहे. गणेशोत्सवामुळे मुंबईमध्येही भाजीपाल्याची मागणी वाढली आहे, परंतु पुरेशी आवक होत नसल्यामुळे व खरेदीच्या ठिकाणीच दर वाढल्यामुळे मार्केटमध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये कोथिंबिरीच्या एका जुडीसाठी १५ ते ३५ रु पये खर्च करावे लागत होते. सद्य:स्थितीमध्ये हे दर ४० ते ५० रु पये झाले असून, किरकोळ मार्केटमध्ये मोठी जुडी ६० ते ७५ रु पयांना विकत घ्यावी लागत आहे. वाटाण्याचे दर होलसेल मार्केटमध्ये ८० ते १०० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गत आठवड्यात ३० ते ३५ रुपये किलो दराने आल्याची विक्री होत होती. सद्य:स्थितीमध्ये हे दर ४० ते ४६ रु पये झाले असून, किरकोळ मार्केटमध्ये ९० ते १०० रु पये किलो दराने विक्री होत आहे. अपवाद वगळता सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. सद्य:स्थितीमध्ये पुणे, नाशिक, सातारा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांतूनही काही प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.पावसामुळे राज्यभर पिकांचे नुकसान झाले आहे. गणेशोत्सवामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. मागणी व पुरवठ्यात फरक पडत असल्यामुळे व उत्पादनाच्या ठिकाणीच दर वाढल्यामुळे एपीएमसीमध्येही भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्र्केट