रासायनिक टँकरसाठी हवा पार्किंग झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:23 AM2017-08-18T02:23:34+5:302017-08-18T02:24:00+5:30

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शेकडो कारखाने आहेत. यामध्ये रासायनिक कारखान्यांची संख्यादेखील मोठी आहे.

Air parking zone for chemical tankers | रासायनिक टँकरसाठी हवा पार्किंग झोन

रासायनिक टँकरसाठी हवा पार्किंग झोन

Next

वैभव गायकर ।
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शेकडो कारखाने आहेत. यामध्ये रासायनिक कारखान्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे ज्वलनशील रसायने भरलेल्या टँकरची परिसरात नेहमीच वर्दळ असते. मात्र, रसायनांनी भरलेल्या टँकरचालक -मालकांकडून अनेकदा नियमांचे पालन होताना दिसत नाही. ही अवजड वाहने रस्त्यात, रहिवासी वस्तीत अनेकदा उभी असलेली दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने घातक असलेल्या या वाहनांवर वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे.
पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे ६ आॅगस्ट रोजी हजारो लिटर पेट्रोलने भरलेला टँकर पलटी झाला होता. या वेळी टँकरमधील पेट्रोल जवळच्या नाल्यात मिसळल्यावर भडका उडून टँकर खाक झाला होता. या दुर्घटनेत टँकरचालकासह इतर पाच पादचारी किरकोळ जखमी झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या ज्वलनशील रसायनांच्या टँकरमुळे औद्योगिक वसाहतीसह पनवेल शहराला नेहमीच धोका आहे. त्यामुळे अशा रसायनांच्या टँकरसाठी एमआयडीसी परिसरात स्वतंत्र पार्र्किं ग झोन विकसित करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी चर्चेसाठी मांडला. मुंबई बॉम्बस्फोटात १० किलो अमोनिया रसायनाचा वापर केलेला होता. त्यानंतर संपूर्ण मुंबई या घटनेत हादरली होती. तळोजा एमआयडीसी परिसरात सुमारे दहा टन किलो वजनाचे अमोनियाने भरलेले टँकर उभे असतात. त्याच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही.
तळोजा एमआयडीसीमध्ये दीपक फर्टिलायजर कंपनीसमोर अमोनिया केमिकलने भरलेले टँकर नेहमी उभे असतात, असा आरोप या वेळी म्हात्रे यांनी केला. विशेष म्हणजे, या ठिकाणी अनेक वेळा टँकरमधून रसायनचोरीच्या घटनाही घडल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे अमोनियाच्या टँकरच्या पार्किंगसाठी एमआयडीसीने स्वतंत्र पार्किंग झोन विकसित करणे गरजेचे होते.
महापालिकेकडून औद्योगिक वसाहतीत कर गोळा केला जातो. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी योग्य ती पावले उचलण्याची मागणी सभेत सभागृहात करण्यात आली. यासंदर्भात औद्योगिक वसाहतीमधील संबंधित अधिकाºयांशी चर्चा करून योग्य उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
वाशी येथून रिलायन्स पेट्रोल केमिकल एचपीसीएलचा २० हजार लिटर पेट्रोल घेऊन निघालेला हरभजन रोडवेज ट्रान्सपोर्टचा टँकर ६ आॅगस्ट रोजी चालकाचा ताबा सुटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील भोकरपाडा येथील नाल्याजवळ पलटी झाला होता. या वेळी पेट्रोल जवळच्या नाल्यात पसरले होते. शिवाय टँकरनेही पेट घेतला होता.
अपघातात चालकासह अन्य पाच जण जखमी झाले होते. त्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूकही ठप्प झाली होती. पनवेल महापालिकेचे अग्निशमन दल, सिडको अग्निशमन दल, मोहोपाडा व रसायनी-पाताळगंगा येथील अग्निशमन दल, रिलायन्स कंपनीच्या फोमच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली होती.
>रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अजवड वाहनांवर आम्ही नियमित कारवाई करीत असतो. ज्वलनशील रसायनांनी भरलेले टँकर रस्त्याच्या कडेला उभे असणे धोकादायक आहे. यासंदर्भात एमआयडीसी व संबंधित कंपन्यांसोबत अनेक वेळा पत्रव्यवहार झाला आहे. अंतर्गत वादामुळे रस्त्यावर उभे राहणाºया अजवड वाहनांचा पार्किंग झोनचा विषय रखडलेला आहे.
- जी. आर. पाटील,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
तळोजा वाहतूक शाखा
>मुंबई बॉम्बस्फोट ही अतिशय भयानक घटना होती. बॉम्बस्फोटासाठी १० किलो अमोनिया वापरला गेला होता. त्या बॉम्बस्फोटात सर्व मुंबई हादरली होती. मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली होती. अशा वेळी तळोजा एमआयडीसीमध्ये दहा टन वजनाचे अमोनियाने भरलेले टँकर रस्त्यावर उभे असतात. अशा टँकरला अपघात झाल्यास संपूर्ण परिसरातच मोठा अपघाताचा फटका बसेल. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानीही घडू शकते.
- अरविंद म्हात्रे,
शेकाप नगरसेवक,
पनवेल महानगरपालिका

Web Title: Air parking zone for chemical tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.