वायू प्रदूषणावर महापालिकेकडून एअर क्लिनिंगचा सोपस्कार! बोनकोडे, कोपरीतील रहिवाशांचा कोंडतोय श्वास
By कमलाकर कांबळे | Published: October 11, 2023 06:37 PM2023-10-11T18:37:12+5:302023-10-11T18:44:35+5:30
या भागात पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात धुके दिसत आहे. त्यातून उग्र वास येत असल्याने रहिवाशांचा श्वास कोंडत आहे.
नवी मुंबई : राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून मानांकन प्राप्त झालेल्या नवी मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. विशेषत: वायू प्रदूषणात मागील पंधरा दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. शहराच्या प्रत्येक भागात प्रदूषणाची समस्या असली तरी त्याचा सर्वाधिक त्रास वाशी सेक्टर २६, कोपरी आणि बोनकोडे गाव आणि परिसरातील रहिवाशांना होत आहे. या भागात पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत मोठ्या प्रमाणात धुके दिसत आहे. त्यातून उग्र वास येत असल्याने रहिवाशांचा श्वास कोंडत आहे.
वातावरणातील दूषित धुलिकणामुळे सकाळी व्यायामाला जाणाऱ्या रहिवाशांना त्रास जाणवत आहे. कोपरी, बोनकोडे, सेक्टर ११ आणि वाशी सेक्टर २६, २८ परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाचा कायमस्वरूपी त्रास आहे. या विरोधात येथील रहिवाशांचा मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. एमआयडीसीतील अनेक कारखान्यांतून प्रक्रिया न करताच रसायन मिश्रित सांडपाणी नाल्यांत सोडून दिले जाते. हा नाला बोनकोडे आणि कोपरी या दोन गावांना विभागून पुढे खाडीकडे जातो. या नाल्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत.
नाल्यातून वाहणाऱ्या रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे परिसरात उग्र दर्प येत आहे. तसेच प्रदूषित वायू हवेत सोडून दिला जातो. त्यामुळे परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिका आणि प्रदूषण मंडळाकडून प्रदूषण रोखण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील हवेतील दूषित धुलिकण सुगंधित करण्यासाठी रात्रीच्या वेळी महापालिकेच्या माध्यमातून नाल्याच्या परिसरात एअर क्लिनिंगसाठी फवारणी केली जात आहे. परंतु हे उपायसुद्धा तुटपुंजे ठरले आहेत. कारण कोपरी, बोनकोडे, वाशी सेक्टर २६ आणि २८ या परिसरात पहाटेच्या वेळी हवेतील धुलिकणांमुळे वातावरण धूरकट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे रहिवासीसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने धास्तावले आहेत.
स्वच्छ हवेसाठी रहिवाशांचे अभियान
कोपरी आणि परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील रहिवासी आक्रमक झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत प्रत्येक रविवारी एक तास ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे. गेल्या रविवारपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. ‘स्वच्छ हवा, हा माझा अधिकार’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान संबंधित शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असून, त्यावर निर्णायक तोडगा निघेपर्यंत ते सुरूच राहील, असे नवी मुंबई विकास अधिष्ठानचे अध्यक्ष संकेत डोके यांनी स्पष्ट केले आहे.