नवी मुंबईत वायुप्रदूषण चिंताजनक, श्वसनाच्या वाढत्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 02:29 AM2020-10-30T02:29:39+5:302020-10-30T02:30:15+5:30
Navi Mumbai pollution News : मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर वायुप्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष स्टेट ऑफ ग्लोबल एअर या संस्थेने व्यक्त केला आहे. तसेच वायुप्रदूषणात नवी मुंबईचा देशात ५१ वा क्रमांक आहे.
नवी मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या नवी मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषत: तुर्भे, कोपरी, सानपाडा व घणसोली परिसरात हा प्रश्न चिंताजनक झाला आहे. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर वायुप्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष स्टेट ऑफ ग्लोबल एअर या संस्थेने व्यक्त केला आहे. तसेच वायुप्रदूषणात नवी मुंबईचा देशात ५१ वा क्रमांक आहे. नवी मुंबईत अशिया खंडातील सर्वांत मोठी औद्यागिक वसाहत आहे. नागरी वसाहतीच्या बाजूलाच असलेल्या येथील कारखान्यांमुळे शहराच्या वायुप्रदूषणात भर पडत असल्याचा निष्कर्ष वेळोवेळी काढण्यात आला आहे. शिवाय नवी मुंबई शहरातून सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर हे दोन प्रमुख मार्ग जातात. या मार्गांवर अवजड वाहनांचा २४ तास राबता असतो. त्यामुळेसुद्धा वायुप्रदूषण होत आहे. ताळेबंदीनंतर मागील महिनाभरात शहरातील वायुप्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. स्थानिक तशा आशयाच्या तक्रारी वाढत आहे. आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त बांगर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
महापालिकेने यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिले आहे. परंतु प्रदूषण मंडळाकडून यासंदर्भात अद्यापि कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. परिणामी, रहिवाशांत असंतोष पसरला आहे. अगोदरच कोविडचे संकट डोक्यावर असताना वायुप्रदूषणाने नवीन आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने शहरवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.