ऐरोलीत सलग १७ तास बत्तीगूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:07 AM2019-03-01T00:07:32+5:302019-03-01T00:07:36+5:30
बारावीच्या परीक्षार्थींची गैरसाय : महावितरणविरोधात असंतोष
नवी मुंबई : महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. बुधवारी ऐरोली विभागात सलग १७ तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. या प्रकाराबद्दल रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, किमान परीक्षेच्या कालावधीत तरी विजेचा लंपडाव थांबवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
घणसोली, ऐरोली विभागात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. अचानक विद्युतपुरवठा खंडित होणे, डीपी बॉक्सला आग लागणे, उघड्या केबल्स, शॉर्टसर्किटच्या वाढत्या घटना आदी प्रकारामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी विद्युतपुरवठा खंडित होतो. तो पूर्ववत करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. बुधवारी रात्री अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला. उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीला आग लागल्याने पहाटे ४ ते रात्री ९ वाजेतपर्यंत विद्युतपुरवठा खंडित झाला. तब्बल १७ तास विद्युतपुरवठा पूर्ववत न झाल्याने बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे, सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. तर शुक्रवारपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. अशातच बुधवारी तब्बल १७ तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.
ऐरोली-गोठीवली दरम्यान वीजपुरवठा करणाºया केबल्सला आग लागल्याने या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड मोठा असल्याने तो दुरुस्त करण्यास विलंब लागल्याचे महावितरणच्या ऐरोली विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश शिंपी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.