ऐरोलीत पालिका कर्मचाऱ्याकडून दुकानदाराला मारहाण
By Admin | Published: December 22, 2016 06:40 AM2016-12-22T06:40:56+5:302016-12-22T06:40:56+5:30
अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्याकडून दुकानदाराला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. ऐरोलीत
नवी मुंबई : अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्याकडून दुकानदाराला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. ऐरोलीत घडलेल्या या मारहाण प्रकरणी दुकानदाराने त्या कर्मचाऱ्याविरोधात रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. मार्जिनल स्पेसमध्ये नसलेले साहित्य देखील कारवाईच्या बहाण्याने उचलले जात असताना त्यास विरोध केल्याने हा प्रकार घडला.
शंकरलाल भंडारी असे जखमी दुकानदाराचे नाव आहे. त्यांचे ऐरोली सेक्टर १६ येथे उत्सव स्टील भांड्याचे दुकान आहे. बुधवारी दुपारी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत परिसरात कारवाई सुरु होती. यावेळी भंडारी यांच्या दुकानाचा बोर्ड व काही साहित्य जप्त करण्याला पथकाने सुरुवात केली. परंतु तो बोर्ड व भांडी मार्जिनल स्पेसमध्ये नसल्याचे सांगत भंडारी यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अडवले.
यावेळी एका कर्मचाऱ्याने हातातील लोखंडी स्टूल तोंडावर मारल्याचा भंडारी यांचा आरोप आहे. यामध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून व्यापाऱ्याकडून घडलेल्या प्रकाराचा संताप व्यक्त होत आहे. कारवाईवेळी पथकातील काही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते असेही त्यांचे म्हणणे आहे.
हा प्रकार त्यांच्यासोबतच्या जाधव नावाच्या अधिकाऱ्याला सांगितला असता, त्यांनीही मान्य करत कारवाईवेळी ते मद्यपान करुनच येतात असे उत्तर दिल्याचे भंडारी यांनी सांगितले. त्यानुसार घडलेल्या प्रकाराची त्यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. (प्रतिनिधी)