नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने ऐरोली विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या प्रक्रियेला गती आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रावर पाठवण्यापूर्वी ईव्हीएम मशीनची प्रतिनिधींच्या समक्ष पडताळणी करून त्या सील करण्याची प्रक्रिया गतीने सुरु आहे. त्यानंतर रविवारी या मशीन संबंधित मतदान केंद्रावर पाठवण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघ्या सहा दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. या कालावधीत निवडणूक विभागाच्या निश्चित कामना गती देण्यात आली आहे. त्यानुसार ऐरोली विधानसभा क्षेत्रातील मशीन सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्रात ७७ सेंटरमध्ये ४२९ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी आवश्यक ४२९ ईव्हीएम मशीन व राखीव मशीन यांची प्रतिनिधींच्या समक्ष पडताळणी घेण्यात आली. यासाठी २२ मशीनवर प्रत्येक उमेदवाराला समाईक अशी १ हजार मते देऊन ती योग्यरीत्या त्याच उमेदवाराला जात आहेत का याची खात्री केली जात आहे.
पुढील दोन दिवस हि प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर सर्व मशीनमध्ये रोल भरून उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष त्या सील केल्या जात आहेत. सहायक निवडणूक अधिकारी सुचिता भिकाने, अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी राहुल सारंग आदींच्या नियंत्रणाखाली हि प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानंतर सर्व सील झालेल्या मशीन रविवारी पोलिस सुरक्षेत मतदान केंद्रावर पाठवल्या जाणार आहेत.