ऐरोली खाडीकिनारी जैविक कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 01:57 AM2021-03-11T01:57:46+5:302021-03-11T01:58:06+5:30
मच्छीमारांच्या जीवाला धोका : शहराच्या विद्रूपीकरणात पडतेय भर
अनंत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : प्लास्टिकच्या पिशव्या, केरकचरा, बांधकामाचे टाकाऊ साहित्य तसेच विविध आजारांवर उपचारासाठी रुग्णालये आणि दवाखान्यात वापरण्यात आलेले वैद्यकीय जैविक टाकाऊ साहित्य ऐरोली खाडीकिनारी निदर्शनास येत आहे. त्यामुळे ऐरोली आणि दिवा कोळीवाड्यातील मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी कोळीवाड्यातील मच्छीमारांकडून होत आहे.
ऐरोली - पटनी नॉलेज सिटी खाडीकिनारी मार्गावर ऐरोली सेक्टर १९ येथील खाडीकिनारी निर्जन ठिकाणी रुग्णालये आणि दवाखान्यांत वापरण्यात आलेला आणि काही मुदत संपलेला टाकाऊ जैविक कचरा पडलेला आहे.
ऐरोली आणि दिवा कोळीवाड्यातील अनेक मच्छीमार याच खाडीत मासेमारीसाठी रात्रंदिवस जात असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा कचरा टाकला गेल्याचा संशय मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. यामुळे ऐरोली आणि दिवा कोळीवाड्यातील मच्छीमारांवर जीवघेण्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी या कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी केली आहे.
घटनास्थळी त्वरित पाहणी केली जाईल. कचरा, डेब्रिज, माती किंवा जैविक कचरा कुठेही टाकू नये याविषयी मार्गदर्शन फलक लावण्यात आलेले आहेत. असे असूनही खाडीकिनारी कुठेही जैविक कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यास किंवा आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- एन. जी. कोकरे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, ऐरोली
ऐरोली खाडीकिनारी दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे रात्री मासेमारीसाठी जाताना अंधाराच्या साम्राज्यातून जावे लागत आहे. अनेकदा येथून जाताना औषधे आणि इंजेक्शनच्या सुयांवर पाय पडून अनेकांना जखमा होतात. संबंधित विभागाने कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे.
- धनाजी पाटील,
अध्यक्ष, ऐरोली कोळीवाडा मच्छीमार सेवा संस्था