ऐरोली-काटई प्रवास होणार अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 07:57 AM2020-11-20T07:57:31+5:302020-11-20T07:57:40+5:30
उन्नत मार्ग ; खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर ऐरोली ते काटई हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांचा होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते पुढे म्हणाले.
ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाच्या कामाचा आढावा गुरुवारी डॉ. शिंदे यांनी घेतला. या वेळी एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. उन्नत मार्गातील पहिला टप्पा सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. नियोजित वेळेआधीच उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी शिंदे यांनी दिल्या.
ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन या टप्प्यातील सहा मार्गिका व बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही कामे झाल्यानंतर प्रवास अत्यंत वेगवान होणार असून, इंधन व वेळेची बचत होणार आहे. शिवाय वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागणार नाही.
या मार्गाचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकरांना होणार आहे. या प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनसाठी नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता प्रस्ताव सादर केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यावर सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्याची प्रक्रियाही लवकर सुरू करण्यात येणार आहे. बाधितांचे पुनर्वसन ठाणे मनपा व एमएमआरडीएतर्फे केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
असा असेल रस्ता
n ऐरोली ते काटई नाका रस्ता हा १२.३ किमी लांबीचा आहे. कामाचे तीन टप्प्यांत विभाजन केले आहे. त्यात पहिला टप्पा ठाणे-बेलापूर, दुसरा ऐरोली पूल ते ठाणे आणि तिसरा काटई नाका असा आहे.
n प्रकल्पाचा पहिला भाग हा अंशत: उन्नत व पारसिक डोंगरातून जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ३८२ कोटी आहे. बोगद्याची लांबी साडेतीन किलोमीटर आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील सगळ्या बोगद्यांपेक्षा जास्त लांबीचा हा बोगदा आहे. त्यात तीन अधिक एक मार्गिका राहणार आहेत.
n बोगद्याच्या बांधकामादरम्यान प्रथमत: सात मीटर रुंद पायलट खोदकाम करण्यात येणार आहे. बोगद्यासाठी पंखे लावून व्हेंटिलेटशन तसेच विद्युतीकरणही करण्यात येणार आहे.