नवी मुंबई : ऐरोलीसह नेरुळ रुग्णालय १ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. दोन्ही ठिकाणी आयसीयूसह मेडिकल वॉर्ड सुरू केले जाणार असून यामुळे वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे.पालिकआयुक्त अभिजीत बांगर यांनी ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालयांच्या उपलब्ध असलेल्या प्रशस्त इमारतींमधील जागांचा संपूर्ण क्षमतेने वापर व्हावा याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी बुधवारी अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयाेजित केली होती.बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे, नेरुळ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता रामरखियानी, ऐरोली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे उपस्थित होते.कोरोना रुग्णालयांसाठी घेण्यात आलेली बेड्स व इतर साधनसामग्री या ठिकाणी वापरणे शक्य असून मनुष्यबळही वापरता येणार आहे. वाशी रुग्णालयाप्रमाणेच ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालये संपूर्ण क्षमतेने सुरू करून एकाच वाशी रुग्णालयावर भार पडणार नाही व नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्याअनुषंगाने या तिन्ही रुग्णालयांनी परस्पर समन्वय राखून नियोजन करावे, असे सूचित करण्यात आले. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक सोमवारी सकाळी ११ वाजता आरोग्यविषयक सुविधांची आढावा बैठक घेणार असल्याचेही आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले.
आयुक्तांचा निर्णयऐरोली व नेरुळ येथील रुग्णालयांच्या प्रशस्त इमारतींचा वापर माता-बाल रुग्णालय व इतर आजारांच्या बाह्यरुग्ण सेवांकरिताच होत आहे. यामुळे आयुक्तांनी ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने वापरली जावीत याकरिता १ जानेवारीची अंतिम मुदत दिली आहे. दोन्ही रुग्णालयांत पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र मेडिकल वॉर्डस् तसेच १० बेड्सचा आयसीयू वॉर्ड सुरू करण्याची कार्यवाही करावी, दोन्ही रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे, गॅस पाइपलाइन व डॉक्टरांसह इतर कर्मचारी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही तत्परतेने करावी, असे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले आहेत.