नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १४, १५ मधील होल्डिंग पाँडजवळून रोडचे काम सुरू आहे. या कामासाठी सुरू असलेल्या भरावामुळे खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या भरावाच्या कामाची चौकशी करावी व नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.भरती व पुराचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी सिडकोने शहरात विविध ठिकाणी खाडीला लागून होल्डिंग पाँड तयार केले आहेत. ऐरोली सेक्टर १४, १५ मध्येही होल्डिंग पाँड तयार केला आहे. वाशीतील मिनी सिशोर व नेरुळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईप्रमाणे या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका संगीता पाटील व अशोक पाटील यांनी वारंवार महानगरपालिकेकडे केली आहे. होल्डिंग पाँडमधील गाळ काढण्याचीही मागणी केली आहे. भराव करायला नक्की किती व कुठे परवानगी आहे, भरावामुळे किती खारफुटीचे नुकसान झाले, याची चौकशी करण्यात यावी व नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माहिती फलक लावावेत सद्यस्थितीमध्ये येथून रोडचे व खाडीपुलाचे काम सुरू आहे. सदर काम करताना ठेकेदाराकडून खारफुटीमध्ये ही भराव केला जात आहे. खारफुटीचे नुकसान होत आहे. काम करताना नक्की कुठे व कसा भराव करायला परवानगी आहे, याविषयी माहिती फलकही लावण्यात आलेले नाहीत. यामुळे परिसरातील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.