विमानतळबाधितांचा सिडकोवर मोर्चा, कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 01:06 AM2020-10-28T01:06:55+5:302020-10-28T01:08:01+5:30

Navi Mumbai News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी दहा गावांचे स्थलांतर करून त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.

Airport affected people March on CIDCO, attempt to cordon off office; Arrest by police | विमानतळबाधितांचा सिडकोवर मोर्चा, कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून धरपकड

विमानतळबाधितांचा सिडकोवर मोर्चा, कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून धरपकड

Next

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी सिडकोवर धडक मोर्चा काढला. संतप्त ग्रामस्थांनी यावेळी सिडको कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात जोरदार घोषणा दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी दहा गावांचे स्थलांतर करून त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. स्थलांतरित गावांतील ग्रामस्थांना सिडकोच्या वतीने भरीव पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. त्यानुसार, आतापर्यंत जवळपास ९७ टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. असे असले, तरी ग्रामस्थांच्या आणखी काही मागण्या आहेत. सिडकोने या मागण्यांची पूर्तता करावी, मगच शंभर टक्के स्थलांतर केले जाईल, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. या प्रलंबित मागण्यांकडे सिडकोचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत, सिडकोच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी आंदोनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोर्चेकरी आणखीनच आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना  विविध पोलीस ठाण्यांत नेले.

दरम्यान, सिडकोच्या वतीने विमानतळबाधितांच्या प्रतिनिधीसोबत सोमवारी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. मोर्चा काढण्यापेक्षा चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन सिडकोच्या वतीने प्रकल्पग्रस्तांना करण्यात आले होते. 

प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक दृष्टी बाळगण्याचे आवाहन 
सिडकोच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यात आली आहे. 
त्यानंतरही काही प्रश्न असतील, तर बसून चर्चा करता येईल. केवळ अडवणूक म्हणून रेटण्यात येणाऱ्या अवास्तव मागण्यांबाबत कोणताही विचार केला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याबाबत प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक दृष्टी बाळगावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याचे दिसुन आले ग्रामस्थांच्या आणखी काही मागण्यांची सिडकोने पूर्तता करावी आशी आपेक्ष आहे.  

विमानतळबाधितांच्या प्रमुख मगण्या 
 स्थलांतरित प्रकल्पग्रस्तांचे नवीन  घर पूर्ण बांधून होत नाही, तोपर्यंत बाजारभावाप्रमाणे घरभाडे मिळावे.
 मच्छीमार व्यावसायिकांना २0१३च्या भूसंपादन कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी.
 अपात्र पद्धत बंद करून सरसकट सर्वांना पुनर्वसन पॅकेज व  इतर लाभ द्यावेत.
 प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्रकल्पग्रस्त दाखल, तसेच योग्य प्रशिक्षण व  रोजगार मिळावा. 
वाढीव बांधकाम खर्च म्हणून प्रती चौरस फुटाला २५00 रुपये द्यावेत.
खासगी मंदिरांसाठी भूखंड व  बांधकाम खर्च देण्यात यावा.
महिला मंडळे व बचत गटा यांच्या बांधकामांना पुनर्वसन पॅकेज लागू करावे.
कोल्ही-कोपर टाटा पॉवर व ड्रेनेज  प्रकल्पाच्या व ट्रस्टीच्या जमिनीच्या बदल्यात १२.५ टक्के आणि २२.५ टक्के योजनेंतर्गत  भूखंड मिळावेत.
चिंचपाडा तलावपाळीला तिप्पट  पुनर्वसन पॅकेज मिळावे.

सिडकोने दिलेले पुनर्वसन पॅकेज
 स्थलांतरित घरांच्या बदल्यात तीन पट भूखंड
स्थलांतर केल्यानंतर १८ महिन्यांचे घरभाडे
 बांधकामासाठी प्रति चौरस फूट १000 रुपये, तसेच मुदतीच्या आत स्थलांतर केल्यास प्रति चौरस फूट प्रोत्साहन भत्ता 
राहत्या घरा व्यतिरिक्त जमीन संपादित झाल्यास २२.५ टक्के विकसित भूखंड
विमानतळबाधितांच्या पाल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण
विमानतळ प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी दहा  दर्शनी मूल्यांचे शंभर समभाग
दहा गावांतील विद्यार्थ्यांसाठी  शाळेच्या चार सुसज्ज इमारतीची उभारणी, तसेच प्रत्येक गावात शाळेसाठी दहा भूखंड देण्याचे मान्य
प्रत्येक गावात महिला मंडळासाठी २000 चौरस मीटरचा भूखंड देण्याबाबत सिडकोची मान्यता

Web Title: Airport affected people March on CIDCO, attempt to cordon off office; Arrest by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.