विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:10 AM2020-01-22T02:10:33+5:302020-01-22T02:11:09+5:30
प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून, प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भीख मांगो आंदोलन केले.
नवी मुंबई : विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांनी ३० दिवसांपासून सिडको भवनसमोर मुक्काम मोर्चा सुरू केला आहे. प्रलंबित प्रश्न
मार्गी लागेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून, प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भीख मांगो आंदोलन केले.
अखिल भारतीय किसान सभेच्या अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने हे आंदोलन सुरू केले आहे. ३० दिवस सिडको भवनसमोर मुक्काम करून व सहा दिवस आमरण उपोषण करूनही अद्याप एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे मंगळवारी या लढ्यात सहभागी झालेल्या महिलांनी भीख मागो आंदोलन केले. सिडको व कोकण भवन परिसरामध्ये भिक मागून जमलेली रक्कम सिडकोला देण्यात येणार आहे. सिडको हे राज्यातील श्रीमंत महामंडळापैकी एक असून, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले जात नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आमरण उपोषणामध्ये १३ जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काहींची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले असून, अद्याप आठ जण आंदोलनात सहभागी आहेत. मुक्काम मोर्चामध्ये शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले असून, यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.
शून्य पात्रता व अपात्र पद्धत बंद करून सरसकट सर्वांना पुनर्वसन पॅकेज लागू करावे. जोपर्यंत सिडको प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत सिडको प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही बांधकाम तोडू नये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना २०१ च्या कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी व सर्व युवक, युवतींना नोकरी उपलब्ध करून द्यावी. प्रकल्पग्रस्तांचे घर बांधून होईपर्यंत बाजारभावाप्रमाणे घरभाडे देण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांना वाढीव बांधकाम खर्च २५०० रुपये द्यावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या असून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे.